मुंबई : पिझ्झ्यामध्ये (Pizza) काचेचे तुकडे सापडणे हे संतापजनक आणि जीवावर बेतणारे ठरू शकते. मुंबईतील एका ग्राहकाने डॉमिनोज (Dominos) या प्रसिद्ध फास्ट फुड रेस्टॉरेंटमधून (Fast Food Restaurant) पिझ्झा मागवला. मात्र, पिझ्झा खात असताना त्याला काचेचे तुकडे (Shards Of Glass) आढळून आलेत. सोशल मीडियावर (Social Media) त्याची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
अरूण कोल्लुरी यांनी डॉमिनोजच्या रेस्टॉरंटमधून पिझ्झा ऑर्डर केला. पिझ्झा खात असताना त्याला काचेचे तुकडे आढळले. पिझ्झामध्ये त्याला तब्बल दोन ते तीन मोठे काचेचे तुकडे आढळले. संतापलेल्या या ग्राहकाने लगेच काचेच्या तुकड्यांसह पिझ्झ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. सदर पोस्टमध्ये त्याने ‘जागो ग्राहक जागो’ यांना टॅगही केले आहे. या पोस्टनंतर पिझ्झा प्रेमींसह सगळ्याच युजर्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
डॉमिनोजच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून जर या व्यक्तीच्या खाण्यात चुकून काच गेले असते तर काय झाले असते, असा संतापजनक विचारही अनेक करीत आहेत. ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली त्याने संताप व्यक्त करत मुंबई पोलिसांत या घटनेबाबत तक्रारही केली आहे. अरूण यांच्या पोस्टवर मुंबई पोलिसांनी उत्तर देत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच, कायदेशीर उपाय शोधण्यापूर्वी डॉमिनोजच्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा, असा सल्लाही मुंबई पोलिसांनी त्याला दिला आहे.






