इस्लामाबादमध्ये पुन्हा होणार शांतता चर्चा; बैठकीची तारीख जाहीर; 'या' दिवशी येणार इराण आणि अमेरिका आमनेसामने ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Donald Trump Iran nuclear deal update : मध्य पूर्वेतील युद्धाची भीषण परिस्थिती (US-Israel Iran War) आणि ओमानच्या आखातातील नौदल नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण जगाचे लक्ष आता पुन्हा एकदा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे लागले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील अणू संघर्षावर राजनैतिक तोडगा काढण्यासाठी चर्चेची एक नवीन आणि अत्यंत संवेदनशील फेरी सोमवारी (२० एप्रिल) सुरू होणार आहे. या बैठकीसाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधी रविवारीच इस्लामाबादमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, जगभरातील मुत्सद्दी या हालचालींकडे डोळे लावून बसले आहेत.
गेल्या आठवड्यात झालेली २१ तासांची मॅरेथॉन चर्चा जरी कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली असली, तरी संवादाची दारे अद्याप बंद झालेली नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. ट्रम्प यांना विश्वास आहे की, आर्थिक निर्बंधांच्या दबावाखाली असलेला इराण या फेरीत काही महत्त्वाच्या अटींवर तडजोड करण्यास तयार होऊ शकतो. मात्र, दुसरीकडे इराणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी अद्यापही अनेक मुद्द्यांवर मतभेद असल्याचे सांगत सावध पवित्रा घेतला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Oil : युद्धाचा फटका की रणनीती? ट्रम्प प्रशासनाचा रशियन तेलाबाबत मोठा निर्णय; भारतासह जगाला मोठा दिलासा
पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये जो तात्पुरता शस्त्रसंधी (Ceasefire) घडवून आणला होता, त्याची मुदत आता संपत आली आहे. जर सोमवारी होणाऱ्या या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही, तर आखाती प्रदेशात पुन्हा एकदा लष्करी कारवायांचा भडका उडू शकतो. म्हणूनच, ही बैठक केवळ इराण किंवा अमेरिकेसाठीच नाही, तर जागतिक तेल पुरवठ्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
🇮🇷🇺🇸🇵🇰 A new round of US–Iran talks is expected to take place in Islamabad, Pakistan, on Monday, according to CNN, citing Iranian officials. pic.twitter.com/KPLqDQQOLo — RusWar (@ruswar) April 18, 2026
credit – social media and Twitter
या संपूर्ण संघर्षाच्या केंद्रस्थानी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ आहे. जगातील २०% तेल व्यापार या मार्गातून होतो. इराणने इशारा दिला आहे की, जर अमेरिकेचा नौदल दबाव आणि नाकेबंदी कायम राहिली, तर हा मार्ग कायमचा बंद केला जाईल. सध्या इराणने हा मार्ग खुला असल्याचे म्हटले असले तरी, युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यापारी जहाजांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. या बैठकीत हा सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्यावर विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bible Prophecy : केवळ निसर्गचक्र नाही! धार्मिक ग्रंथांतील ‘प्रलयाच्या’ खुणा इस्रायलमध्ये? ‘या’ भविष्यवाण्या झाल्या खऱ्या
लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील शस्त्रसंधीचा प्रभाव देखील या चर्चेवर पडताना दिसत आहे. इराण हिजबुल्लाहचा प्रमुख पाठीराखा असल्याने, प्रादेशिक शांततेसाठी इराणला विश्वासात घेणे अमेरिकेसाठी अनिवार्य झाले आहे. शांततेसाठी हा अखेरचा प्रयत्न मानला जात असून, राजनैतिक मार्गाने युद्ध टाळता येईल का? याचे उत्तर सोमवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.






