

अमृतसर : 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. 117 जागापैकी काँग्रेसने 77 जागावर विजय मिळवला होता. तर अकाली दल 15, भाजप 3 आणि आम आदमी पार्टीला 20 जागांवर विजय मिळाला होता. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती. पण या निवडणुकीत आपच्या झाडुने सर्व पक्षांना साफ केले आहे. वर्षभरापासून शेतकरी आंदोलोनामुळे चर्चेत असलेल्या पंजाबने निवडणुकीची चौकट पार केली आहे आणि नवा पायंडा निश्चित केला आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारुन पंजाबी नागरिकांनी आपला कौल हा आम आदमी पार्टीला दिला आहे. आपच्या भगवंत मान या नव्या शिलेदाराकडे आता मुख्यमंत्रीपदाची सूत्रे येणार आहेत. औपचारिक घोषणा आता केवळ शिल्लक आहे.
यामुळं काँग्रेसला फटका
पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ती होती, पण आपआपसातील मतभेद याचा फटका काँग्रेसला बसला आहे. काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामिल झाले.
आपची सत्ता दोन राज्यात
पंजाबमध्ये सत्ता आल्यास आपला सत्ता मिळालेलं हे दुसरं राज्य असेल. भगवंत मान हे आपचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले आहेत. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये सत्ता येणार असल्याचा दावा अनेकदा केला होता. तसेच पंजाबमध्ये आपनं मोठी ताकत लावली होती. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. मतदारांनी यावेळी समिश्र प्रतिसाद दर्शवल्याने 65.32 टक्के मतदानाची नोंद पंजाबमध्ये झाली होती. दरम्यान, निवडणुकांच्या निमित्ताने पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी याठिकाणी प्रचार केला होता. दरम्यान, पंजाबमध्ये दिग्गज पिछाडीवर गेले आहेत. यात मुख्यमंत्री चणरजीत चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग, नवज्योतसिंग सिद्धू आमि सुखबीर सिंह बादल यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पटियाला मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. चरणजीत सिंग चन्नी भदौड आणि चमकौर या दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर आहेत. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू हे अमृतसर पूर्व मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आत्तापर्यंत पंजाबच्या मंत्रिमंडळातील १७ मंत्री पिछाडीवर आहेत.
हे गाजले मुद्दे
ऐतिहासिक शेतकरी आंदोलनामुळं भाजपवर लोकांची नाराजी सहाजिकच होती. याचा फटका भाजपला बसला. या आंदोलनात पंजाबमधील शेतकरी आघाडीवर होते. त्यामुळं बळीराजाचा प्रश्न सोडविण्यात केंद्रातील भाजप सरकारला अपयश आले. तसेच काँग्रेसने विरोधीपक्ष म्हणून जेवढा आक्रमक मुद्दा लढविला पाहिजे होता, तेवढा जोर लावला नाही, त्यामुळं शेतकरी आंदोलनाच फटका भाजप व काँग्रेसला बसला. तसेच कोरोनाकाळात आपने केलेले काम हे लोकांना भावले. त्यामुळं जनतेनं आपच्या बाजूने कौल दिला आहे. तसेच बेरोजगारी, शेतकरी मालाचे हमीभाव, कोरोना, नोकरी आदी प्रश्न या निवडणुकीत विशेष गाजले.