

महिंद्रा व्हिजन एस 2027 मध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून येण्याची शक्यता आहे.
गाडीमध्ये 2,665 मिमी व्हीलबेस आणि बॉक्सी डिझाइन मिळण्याची शक्यता आहे.
पेट्रोल, डिझेल, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचे ऑप्शन मिळू शकतात.
महिंद्रा कंपनी भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आपल्या एसयूव्ही पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. 2027 मध्ये कंपनीची Mahindra Vision S ही नवीन कॉम्पॅक्ट SUV सादर होण्याची शक्यता आहे. ही गाडी 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये दाखल होऊ शकते. विशेष म्हणजे, या गाडीमध्ये स्कॉर्पिओ एनसारखी बॉक्सी डिझाइन स्टाइल पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कमी आकाराची पण मोठ्या SUV सारखी ओळख असलेली गाडी शोधणाऱ्या कस्टमर्ससाठी हा एक नवीन ऑप्शन ठरू शकतो.
2027 पर्यंत 5 नवीन गाड्या आणण्याचे नियोजन
महिंद्राने 5 नोव्हेंबर रोजी सादर केलेल्या इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमध्ये जून 2027 पर्यंत 5 नवीन गाड्या आणण्याचे नियोजन मांडले होते. यामध्ये NU_IQ प्लॅटफॉर्मवर आधारित एका नवीन एसयूव्हीचाही समावेश आहे. व्हिजन एस हीच गाडी असण्याची शक्यता आहे. या प्रोजेक्टसाठी कंपनी चाकण येथील प्लांटमध्ये मार्च 2028 पर्यंत दरमहा 10,000 युनिट्सची जास्त प्रोडक्शन कॅपसिटी वाढवण्याची तयारी करत आहे.
XUV 3XO पेक्षा मोठा व्हीलबेस
महिंद्रा व्हिजन एसची लांबी 4 मीटरपेक्षा कमी असली तरी तिचा व्हीलबेस 2,665 मिमी आहे. याउलट महिंद्रा XUV 3XO चा व्हीलबेस 2,600 मिमी आहे. यामुळे केबिनमध्ये प्रवाशांना जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. NU_IQ प्लॅटफॉर्ममध्ये फ्लॅट फ्लोअरची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना पाय ठेवण्यासाठी चांगली जागा मिळू शकते.
पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हर्जनची शक्यता
NU_IQ प्लॅटफॉर्मची खासियत म्हणजे यावर पेट्रोल, डिझेल, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक अशा वेगवेगळ्या पॉवरट्रेनवर आधारित गाड्या तयार करता येतात. तसेच फ्रंट व्हील ड्राइव्ह आणि ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टिमचाही सपोर्ट आहे. सुरुवातीच्या व्हर्जनमध्ये XUV 3XO मधील 1.2-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे.
डिझाइन आणि इंटिरियरमध्ये काय मिळणार?
चाचणीदरम्यान दिसलेल्या टेस्ट मॉडेलमध्ये बॉक्सी डिझाइन, उंच बोनेट आणि मागच्या बाजूला साइड-हिंग्ड टेलगेटवर बसवलेले स्पेअर व्हील दिसले आहे. कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बाहेरील दृश्य दाखवण्याची व्यवस्था होती. पण टेस्ट मॉडेलमध्ये पारंपरिक ORVM देण्यात आले आहेत. तसेच फ्लश डोअर हँडल आणि पॅनोरॅमिक सनरूफही दिसून आले आहेत.
केबिनमध्ये डॅशबोर्डवर इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि त्याखाली फिजिकल कंट्रोल्स मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट 2025 मध्ये महिंद्राने व्हिजन एससोबत व्हिजन टी, व्हिजन एसएक्सटी आणि व्हिजन एक्स हे कॉन्सेप्ट मॉडेल सादर केले होते. या सर्व गाड्या NU_IQ प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. त्यामुळे व्हिजन एसच्या माध्यमातून महिंद्रा आपल्या नव्या प्लॅटफॉर्मची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येही चाचणी करू शकते.