(फोटो सौजन्य-AI एआय)
पैसे वाचवण्यासाठी मोठी कमाईच पाहिजे असे नाही, तर नियमित बचतीची सवयही महत्त्वाची असायला लागते. आणि माणसाचे भन्नाट शौक त्याला काय काय करायला लावतील, ते देवच जाणे. तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्यातील बी. रवी जोसेफ यांनी हेच दाखवून दिले आहे. त्यांनी तब्बल 3 वर्षे दररोजच्या व्यवहारांतून मिळणारी 10 रुपयांची नाणी बाजूला ठेवली आणि त्यातून 1.23 लाख रुपये जमवले. या बचतीतून त्यांनी नवीन होंडा अॅक्टिव्हा स्कूटर खरेदी केली. त्यांच्या या अनोख्या बचतीची आणि खरेदीची चर्चा आता सोशल मीडियावर जोरदार होत आहे.
रोजच्या व्यवहारातून केली छोटी-छोटी बचत
रवी जोसेफ हे व्यवसायाने पाद्री आहेत. भाजीपाला, किराणा सामान आणि घरासाठी लागणाऱ्या इतर वस्तू खरेदी करताना त्यांच्या हातात उरलेली 10 रुपयांची नाणी ते नियमितपणे साठवून ठेवत होते. ही नाणी खर्च करण्याऐवजी त्यांनी ती एका ठिकाणी जमा केली. दिवसागणिक जमा होणारी छोटी रक्कम 3 वर्षांत मोठ्या बचतीत बदलली.
या काळात त्यांनी एकूण 1,23,000 रुपये जमा केले. यासाठी त्यांना तब्बल 12,300 नाणी साठवावी लागली. कुटुंबासाठी उपयोगी वस्तू खरेदी करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही बचत सुरू केली होती. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना ही पद्धत कितपत उपयोगी ठरेल, याबाबत शंका होती. पण नंतर त्यांनीही जोसेफ यांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला.
Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!
जुन्या दुचाकीला वारंवार त्रास; नवीन स्कूटर घेण्याचा निर्णय
रवी जोसेफ यांच्याकडे आधीपासून मोटरसायकल होती. पण ती वारंवार बिघडत असल्याने आणि व्यवस्थित चालत नसल्याने त्यांनी नवीन वाहन घेण्याचा विचार केला. त्यासाठी वर्षानुवर्षे जपून ठेवलेली बचत वापरण्याचे त्यांनी ठरवले. अखेर 10 रुपयांच्या नाण्यांतून जमा केलेल्या पैशांतून त्यांनी होंडा अॅक्टिव्हा खरेदी केली.
शोरूमने स्वीकारली 12,300 नाणी
या खरेदीतील सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे संपूर्ण रक्कम नाण्यांच्या स्वरूपात देण्यात आली. शोरूमच्या व्यवस्थापकाच्या माहितीनुसार, जोसेफ यांनी स्कूटर खरेदीच्या सुमारे 15 दिवस आधी डीलरशिपशी संपर्क साधून 10 रुपयांची नाणी स्वीकारली जातील का, याची चौकशी केली होती. शोरूमने होकार दिल्यानंतर ते 1.23 लाख रुपयांची नाणी घेऊन आले आणि व्यवहार पूर्ण केला.
2027 होंडा रिबेल 500 मध्ये मोठे अपडेट! आता मिळणार TFT डिस्प्ले आणि E-Clutch टेक्नोलॉजी
या घटनेतून नियमित बचतीची ताकद दिसून येते. रोज बाजूला ठेवलेली छोटी रक्कमही योग्य नियोजन आणि संयमाच्या जोरावर मोठ्या उद्दिष्टासाठी उपयोगी पडू शकते. जोसेफ यांची ही कहाणी बचतीची सवय लावू इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.






