

फोक्सवॅगनवर भारतात 10,500 कोटी रुपयांच्या कराची मागणी करण्यात आली आहे.
मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि किया कंपन्यांच्या आयातीचाही न्यायालयात उल्लेख झाला.
CKD किटच्या आयातीवर 30 ते 35% कर लागू होतो.
भारतातील वाहन उद्योगात फोक्सवॅगन आणि केंद्र सरकार यांच्यातील करवाद आता नवीन वळणावर पोहोचला आहे. मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि किया यांसारख्या कंपन्याही कारचे सुटे भाग आयात करताना अशाच पद्धतींचा वापर करतात, असा दावा फोक्सवॅगनने केला होता. पण केंद्र सरकारने हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे सांगत फेटाळला आहे. हा वाद तब्बल 10,500 कोटी रुपयांच्या कर मागणीशी संबंधित असून त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
फोक्सवॅगनवर 10,500 कोटींच्या कराची मागणी
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, 2024 मध्ये भारतीय कर अधिकाऱ्यांनी फोक्सवॅगनवर कारच्या सुट्या भागांच्या आयातीमध्ये चुकीचे वर्गीकरण केल्याचा आरोप केला होता. कंपनी ऑडी, स्कोडा आणि फोक्सवॅगनच्या कारसाठी लागणारे शेकडो पार्ट्स वेगवेगळ्या शिपमेंटमध्ये भारतात मागवत होती. या पार्ट्सना स्वतंत्र सुटे भाग म्हणून दाखवून कंपनीने 5 ते 15% आयात कर भरल्याचा आरोप आहे.
सरकारच्या मते, प्रत्यक्षात हे पार्ट्स पूर्ण कारच्या CKD (Completely Knocked Down) किटचा भाग होते. अशा किटवर 30 ते 35% आयात कर लागू होतो. त्यामुळे कमी कर भरून कंपनीने 12 वर्षांच्या कालावधीत सरकारी महसुलाचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फोक्सवॅगनने हे आरोप नाकारले असून कर मागणीला न्यायालयात आव्हान दिले आहे.
मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूच्या आयातीचा उल्लेख
या प्रकरणात फोक्सवॅगनने मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि किया या कंपन्यांची उदाहरणे दिली होती. या कंपन्याही वाहनांचे पार्ट्स वेगवेगळ्या स्वरूपात आयात करतात, असा युक्तिवाद करण्यात आला. पण सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये हा दावा अपूर्ण माहितीवर आधारित असल्याचे म्हटले आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, इंजिन किंवा गिअरबॉक्स आधीच जोडलेल्या स्वरूपात इतर वाहन पार्ट्ससोबत आयात केल्यास त्यावर 30 ते 35% कर लागू होतो. मर्सिडीज-बेंझ आणि ह्युंदाई या कंपन्या अशा आयातीचे योग्य वर्गीकरण करून लागू कर भरतात, असेही सरकारने नमूद केले आहे.
मर्सिडीज-मायबॅकच्या आयातीवरही चर्चा
या वादात मर्सिडीज-मायबॅक कारच्या आयातीचाही उल्लेख झाला आहे. या लक्झरी कारची किंमत 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, मर्सिडीज-बेंझ या कारसाठी आधीपासून जोडलेले इंजिन, ट्रान्समिशन आणि गिअरबॉक्स आयात करताना 30 ते 35% कर भरते. पण फोक्सवॅगनने मायबॅकसारख्या महागड्या कारचे उदाहरण आपल्या वाहनांशी संबंधित प्रकरणासाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालय 30 नोव्हेंबर रोजी या प्रकरणात कर अधिकाऱ्यांची 12 वर्षांच्या आयातीची तपासणी योग्य आहे की नाही, यावर निर्णय देणार आहे. या निकालाचा भारतातील परदेशी वाहन कंपन्यांच्या आयात धोरणावरही परिणाम होऊ शकतो.