

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत सादर केलेले अंदाजपत्रक देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे आहे. हे अंदाजपत्रक १३० कोटी भारतीयांचे जीवन अधिक सुसह्य करणारे आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, "आपल्या देशामध्ये कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर या प्राधान्य क्षेत्राला कर्ज देण्यासाठी बॅकांसमोर १६ लाख कोटी रुपयांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. याचा फायदा निश्चितपणे शेतकरी आणि शेती क्षेत्राला होणार आहे.'
"आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत आहे. नवीन कृषी कायद्यात कोणती बाब शेतकऱ्यांच्या हिताची नाही ते विरोधकांनी सांगावे. शेतकऱ्यांना स्वतःच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही काय? एमएसपीकरीता आमच्या सरकारने ३५० लाख कोटी दिले आहेत. सध्या कृषी क्षेत्रात अनेक समस्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे. पण नवीन कायद्यांवरुन काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत."