बाणेर-वाकडनंतर 'म्हाळुंगे' ठरतेय रिअल इस्टेटचे 'हॉटस्पॉट'!; हिंजवडी सानिध्यामुळे गृहखरेदीदारांची पहिली पसंती
म्हाळुंगेच्या या वेगाने होत असलेल्या कायापालटामागे त्याचे मोक्याचे भौगोलिक स्थान सर्वात कळीचा मुद्दा ठरले आहे. आशियातील सर्वात मोठ्या आयटी केंद्रांपैकी एक असलेल्या हिंजवडीच्या उंबरठ्यावर हा परिसर वसलेला आहे. तसेच मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाशी थेट कनेक्टिव्हिटी आणि बाणेर, बालेवाडी तसेच वाकड या विकसित भागांशी जोडलेले अंतर्गत रस्ते यामुळे येथून ये-जा करणे अधिक सुलभ झाले आहे.
वाकड आणि बाणेरसारख्या प्रस्थापित भागांमध्ये बांधकामाची घनता प्रचंड वाढल्याने नव्या प्रकल्पांसाठी जागेची मर्यादा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, म्हाळुंगेमध्ये अजूनही मोठे भूखंड उपलब्ध असल्याने बड्या बांधकाम व्यावसायिकांना एकाच छताखाली आधुनिक जीवनशैली आणि नियोजनबद्ध पायाभूत सुविधा देणारे भव्य प्रकल्प उभारणे शक्य होत आहे.
बांधकाम क्षेत्रातील ‘गेरा पुणे निवासी स्थावर मालमत्ता’ अहवालानुसार, पश्चिमोत्तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड लगतच्या पट्ट्यात (हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि म्हाळुंगे) गृहखरेदीत मोठी तेजी नोंदवली गेली आहे.
विक्रीत २९ टक्क्यांची वाढ : जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत या संपूर्ण पट्ट्यात तब्बल १२ हजार १२० घरांची विक्री झाली असून, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत यात २९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
दरांचा चढता आलेख : २०२१ मध्ये म्हाळुंगे परिसरात घरांचे सरासरी दर ६ हजार २९८ रुपये प्रति चौरस फूट होते. २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत हा दर थेट ९ हजार १४५ रुपये प्रति चौरस फुटांपर्यंत पोहोचला आहे.
खिशावर पडणारा भार : साध्या भाषेत सांगायचे तर, २०२१ मध्ये सरासरी १ हजार चौरस फुटांच्या घरासाठी ग्राहकाला सुमारे ६३ लाख रुपये मोजावे लागत होते; त्याच घराचे मूल्य आज सुमारे ९१ लाख रुपयांवर पोहोचले आहे.
Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
म्हाळुंगेच्या विकासाला खरी गती दिली आहे ती पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान सुरू होणाऱ्या ‘पुणे मेट्रो मार्गिका क्रमांक ३’ मुळे हिंजवडी हे रोजगारकेंद्र शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडले जाणार आहे. म्हाळुंगे थेट या कॉरिडॉरलगत असल्याने येथील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा एक वेगवान व पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होत आहे.
केवळ चार भिंतींची घरे न उभारता, या भागात शैक्षणिक संस्था, अत्याधुनिक आरोग्य सुविधा, व्यापारी संकुले, मनोरंजन केंद्र आणि अंतर्गत प्रशस्त रस्त्यांचे जाळे वेगाने उभे राहत आहे. परिणामी, म्हाळुंगेची ओळख केवळ ‘उपशहर’ अशी न राहता एका स्वावलंबी निवासी संकुलात (इकोसिस्टम) त्याचे रूपांतर होत आहे.
सध्या या भागात व्हीटीपी रिअॅल्टी, गोदरेज प्रॉपर्टीज यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील विकासकांचे भव्य गृहप्रकल्प आकारास आले आहेत. व्हीटीपी बेलिसिमो, व्हीटीपी टाउन स्क्वेअर, व्हीटीपी एथेरियस तसेच गोदरेज हिलसाइड इस्टेट आणि मेडोज यांसारख्या प्रकल्पांमुळे या परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे.
पारंपरिक नागरी वस्त्यांच्या तुलनेत म्हाळुंगे हे आधुनिक पिढीच्या, विशेषतः आयटी कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीला साजेसे असे ‘हाय-टेक टाउनशिप’ म्हणून नावारूपास येत असून, आगामी काळात पश्चिम पट्ट्यातील गुंतवणुकीचे आणि निवासाचे ते प्रमुख केंद्र ठरेल यात शंका नाही.






