

RBI Gold Reserve : गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्याची परिस्थिती बरीच घसरताना दिसत आहे. दरांत सातत्याने घसरण सुरुच आहे. या सगळ्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI ने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. गेल्या सहा महिन्यांत, RBI ने परदेशातून सुमारे ६० टन सोनं मायदेशात परत आणलं आहे. यामुळे नेमका काय फायदा झाला? आणि भारताचा तिजोरी सोन्याचा किती साठा वाढला?
आरबीआयच्या एकूण सुवर्णसाठ्यापैकी सुमारे ८४% साठा आता देशांतर्गत आहे. यापूर्वी हा आकडा ७७% पेक्षा किंचित जास्त होता. याचा अर्थ असा की, भारत आता आपल्या सोन्याचा एक मोठा हिस्सा देशांतर्गत साठवत आहे. जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या काळात आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.
RBI कडून आलेल्या अहवालामध्ये दिलं आहे की, मार्च ते सप्टेंबर २०२६ दरम्यान ६०.०८ टन सोने भारतात परत आणले आहे. परिणामी, आरबीआयकडे आता एकूण ८८०.५२ टन सोने आहे. यापैकी, सप्टेंबर २०२६ च्या अखेरीस ७४०.१३ टन सोने भारतात राहिले आहे. उर्वरित सोने परदेशात साठवले आहे. पण, यामुळे भारताच्या एकूण सोन्याच्या साठ्यात वाढ झालेली नाही; केवळ परदेशात साठवलेले सोने भारतात परत आणले गेले आहे.
आरबीआयच्या या निर्णयामागील मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत सोन्याच्या साठ्याचे संरक्षण करणे हे आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये तणाव, युद्धे आणि आर्थिक अनिश्चितता कायम आहे. अशा वातावरणात, परदेशात साठवलेले सोने धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, भारताला आपल्या सोन्याचा मोठा हिस्सा देशांतर्गत ठेवायचा आहे, जेणेकरून गरज पडल्यास त्यावर सहज नियंत्रण ठेवता येईल आणि त्याचा देशाला फायदा होईल.
आजकाल भारतात सोन्याच्या किमती झपाट्याने घसरत आहेत. जानेवारीमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे १.८० लाख रुपये होता, जो आता घसरून सुमारे १.२० लाख रुपयांवर आला आहे. ही भावातील २७% घसरण दर्शवते. पण, तज्ज्ञांच्या अंदाजानुसार नजीकच्या काळात, म्हणजेच २०२७ पर्यंत, भाव पुन्हा वाढून १.५ लाख रुपयांपर्यंत पोहोचतील असा अंदाज वर्तवला जात आहे.