फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Banking Recruitment September 2026 : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सप्टेंबर महिना अनेक नवीन संधी घेऊन आला आहे. देशातील विविध बँका आणि बँकिंग संस्थांमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, या भरतीमध्ये फ्रेशर्सपासून ते अनुभवी उमेदवारांपर्यंत प्रत्येकासाठी संधी उपलब्ध आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, आयबीपीएस, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि नैनिताल बँक यांसारख्या सात प्रमुख भरती मोहिमांमधून एकूण १८,१०४ पदे भरली जाणार आहेत. मात्र, सर्व पदांसाठी पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया वेगवेगळी आहे. काही पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल, तर काही ठिकाणी मुलाखत आणि अनुभवाला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची पात्रता तपासून अर्ज करावा.
भारतीय स्टेट बँक तर्फे स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरती २०२६ अंतर्गत एकूण २८३ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणतीही लिखित परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांची निवड थेट मुलाखत आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल. ठरवून दिलेले पात्रता निकष पूर्ण करणारे अनुभवी उमेदवार यासाठी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
बँक ऑफ बडोदने (BOB) स्पेशलिस्ट ऑफिसर भरती २०२६ अंतर्गत वेल्थ एक्झिक्युटिव्ह आणि क्रेडिट अॅनालिस्टच्या एकूण १,१०० पदांवर भरती काढली आहे. इच्छुक उमेदवार २४ सप्टेंबर २०२६ पर्यंत bankofbaroda.bank.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी पदवी किंवा काही पदांवर पदवीसह सीए (CA) असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव अनिवार्य आहे.
बँकिंग क्षेत्रातील या सर्व भरतीमध्ये सर्वात मोठी संधी ‘आयबीपीएस आरआरबी भरती २०२६’ च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन (IBPS) ने प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये ऑफिसर स्केल-I, स्केल-II, स्केल-III आणि ऑफिस असिस्टंट (ग्रुप-बी) च्या एकूण १३,७०६ जागांवर भरती काढली आहे. पात्र उमेदवार २१ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करताना उमेदवारांनी एकाच पदाचा किंवा श्रेणीचा काळजीपूर्वक पर्याय निवडणे गरजेचे आहे.
बँक ऑफ इंडियाने (BOI) स्केल-IV पर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या एकूण २०५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये तांत्रिक, माहिती सुरक्षा, कायदा, अग्निशमन आणि सुरक्षा यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या भरतीसाठी १० सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येईल. उमेदवारांकडे बीई, बीटेक, एमटेक, एमसीए किंवा पदवी असणे आवश्यक असून, निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश असेल.
इंडियन ओव्हरसीज बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या २९१ पदांवर भरती जाहीर केली आहे. यामध्ये JMGS-I, MMGS-II आणि MMGS-III श्रेणीतील पदांचा समावेश आहे. यासाठी किमान वेतन ४८,४८० रुपयांपासून ते कमाल १,०५,२८० रुपयांपर्यंत आहे. वयोमर्यादा २२ ते ४५ वर्षे ठरवण्यात आली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२६ आहे.
बँक ऑफ बडोदने लोकल बँक ऑफिसर (LBO) भरती २०२६ अंतर्गत २,४८२ जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांकडे बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ४८,४८० ते ८५,९२० रुपयांपर्यंत वेतनमान मिळेल. तसेच त्यांना किमान तीन वर्षे सेवा देण्याचा बॉन्ड देखील लिहून द्यावा लागेल.
नैनिताल बँक लिमिटेडने ग्रेड/स्केल-I, II आणि III अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या एकूण ३७ जागांवर भरती काढली आहे. या पदांसाठी परीक्षा ऑक्टोबर २०२६ मध्ये होणार आहे.
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! पेपरफुटीप्रकरणी सरकार आणि आयोगाविरोधात नेते आक्रमक
बँक ऑफ बडोदा (LBO) आणि नैनिताल बँक: ७ सप्टेंबर २०२६ (अंतिम तारीख)
इंडियन ओव्हरसीज बँक: १५ सप्टेंबर २०२६
आयबीपीएस आरआरबी: २१ सप्टेंबर २०२६
बँक ऑफ बडोदा (SO): २४ सप्टेंबर २०२६
एसबीआय (SCO) आणि बँक ऑफ इंडिया: २५ सप्टेंबर २०२६






