Diwali Bonus Rules 2026 (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिवाळी आली की नोकरी करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, यंदा बोनस मिळणार का? वर्षभर काम केल्यावर पगाराव्यतिरिक्त थोडे जास्त पैसे मिळाले तर दिवाळी अजून गोड होते. काही कंपन्या रोख पैसे देतात, काही गिफ्ट देतात, काही मिठाई देतात. पण अनेकांना वाटते की दिवाळीला बोनस देणे कंपनीला सक्तीचे आहे. खरच तसे आहे का? चला सोप्या भाषेत समजून घेऊ. Diwali Bonus Rules 2026:
सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की बोनसचे दोन प्रकार असतात. एक असतो सणाचा बोनस आणि दुसरा असतो कायद्याने मिळणारा बोनस.
दिवाळीला जो बोनस मिळतो त्याला फेस्टिवल बोनस म्हणतात. हा कंपनीच्या मनावर असतो. कंपनीला वाटले तर देईल, नाही वाटले तर नाही देणार. यासाठी तुम्ही कंपनीला जबरदस्ती करू शकत नाही. हा कायदेशीर हक्क नाही. कंपनीचा नफा झाला असेल, कंपनीची परिस्थिती चांगली असेल तर मालक खुश होऊन देतो.
पण दुसरा जो बोनस आहे तो कायद्याचा बोनस आहे. याला वार्षिक बोनस म्हणतात. हा पूर्वी Payment of Bonus Act 1965 नुसार मिळायचा, आता तो Code on Wages 2019 मध्ये आला आहे. त्याच्या कलम 26 ते 41 मध्ये याचे सगळे नियम लिहिले आहेत. हा बोनस कंपनीला द्यावाच लागतो.
कायद्यानुसार कंपनीला कमीत कमी 8.33% आणि जास्तीत जास्त 20% पर्यंत बोनस द्यावा लागतो. पण हा तुमच्या पूर्ण पगारावर नाही मोजत.
सरकारने यासाठी एक लिमिट ठेवली आहे. समजा तुमचा पगार 50,000 आहे, पण बोनस मोजण्यासाठी सरकारने 7,000 रुपये किंवा त्या राज्याचे किमान वेतन ही मर्यादा ठेवली आहे. त्यावरच 8.33% मोजला जाईल. म्हणजे पगार जास्त असला तरी बोनस त्याच लिमिटवर मिळतो.
हा नियम सगळ्याच कंपन्यांना नाही. ज्या कंपनीत 20 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करतात त्यांनाच हा कायदा लागू होतो. 10 लोक असलेल्या छोट्या दुकानाला हा नियम लागू होत नाही. तसेच तुमचा पगार एका ठराविक मर्यादेत असला तरच तुम्ही पात्र ठरता.
अनेकांना वाटते बोनसवर टॅक्स नाही लागत. पण हे चुकीचे आहे. कंपनीने दिलेला बोनस हा तुमच्या पगाराचाच भाग समजला जातो. तो तुमच्या वर्षाच्या एकूण उत्पन्नात जोडला जातो आणि मग तुमचा जो टॅक्स स्लॅब असेल त्यानुसार टॅक्स लागतो. म्हणजे बोनस पूर्णपणे करमुक्त नाही.
तुम्ही जर सगळ्या अटींमध्ये बसत असाल, 20 पेक्षा जास्त लोक असलेल्या कंपनीत काम करत असाल, तरी पण कंपनी बोनस देत नसेल तर घाबरू नका. तुम्ही काही गोष्टी करू शकता.
पहिले तुमचे अपॉइंटमेंट लेटर नीट वाचा. त्यात बोनसबद्दल काय लिहिले आहे ते बघा. तुमच्या सॅलरी स्लिप सांभाळून ठेवा.नंतर HR कडे किंवा बॉसकडे लेखी विचारा की बोनस का दिला नाही. तोंडी नको, ईमेल किंवा पत्राने विचारा.तरी पण उत्तर नाही मिळाले तर तुम्ही थेट कामगार कार्यालयात जाऊ शकता. तुमच्या भागातील उप कामगार आयुक्ताकडे तक्रार करू शकता. किंवा कामगार न्यायालयात केस पण टाकू शकता.
लक्षात ठेवा, दिवाळीचा गिफ्ट वाला बोनस हा कंपनीच्या इच्छेवर आहे, पण कायद्याने मिळणारा वार्षिक बोनस हा तुमचा हक्क आहे. त्यामुळे आपले कागदपत्रे जपून ठेवा आणि आपल्या हक्कांबद्दल जागरूक रहा. दिवाळीच्या गोडव्यासोबत आपला हक्क पण माहिती असायला हवा.






