फोटो सौजन्य- सोशल मीडिया
DY Patil Education Society Kolhapur Recruitment: कोल्हापूर येथील प्रसिद्ध डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मोहिमेच्या माध्यमातून शिक्षण संस्थेच्या विविध विभागांमधील तांत्रिक, प्रशासकीय आणि सहाय्यक पदांच्या एकूण रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने लॅब असिस्टंट, लायब्ररियन, क्लर्क, हॉस्टेल वार्डन आणि सेक्युरिटी गार्ड या पदांचा समावेश असून, योग्य उमेदवारांसाठी ही रोजगाराची एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
या भरतीमधील विविध पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. लॅब असिस्टंट पदासाठी सिव्हिल, मेकॅनिकल किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा, बी.ई. किंवा बी.टेक. पदवी आणि २ ते ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच लायब्ररियन पदासाठी एम.लिब. पदवीसह नेट, सेट किंवा पीएचडी आणि महाविद्यालयीन ग्रंथालयाचा ५ वर्षांचा अनुभव मागवण्यात आला आहे.
क्लर्क पदासाठी उमेदवार पदवीधर असण्यासोबतच कॉम्प्युटरचे प्राविण्य आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे, तर हॉस्टेल वार्डन पदासाठी संबंधित अनुभवासह पदवीधर असणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षक पदासाठी माजी सैनिक आणि अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
संस्थेच्या नियमांनुसार योग्य आणि पात्र उमेदवारांसाठी वेतनाची कोणतीही अडचण असणार नाही, म्हणजेच गुणवान उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाईल. ११ सप्टेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला रेज्युमे (Resume) hrcorporate@dypgroup.org या अधिकृत ईमेल पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. तरी इच्छुक उमेदवरांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.






