फोटो सौजन्य-नवराष्ट्र टीम
Murud Kotwal Recruitment 2026: महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार आणि मुरुड तालुक्यातील रिक्त पदे भरण्यासाठी विशेष मान्यता मिळाल्यानंतर, रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात महसूल सेवक (कोतवाल) संवर्गाच्या सरळसेवा भरती २०२६ चा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ११ रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार असून, यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाचा समावेश आहे.
या जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २, भटक्या जमाती (ब) साठी १, एस.ई.बी.सी. (SEBC) साठी २, इतर मागासवर्गीय (इ.मा.व.) साठी २, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) २ आणि खुला/अराखीव प्रवर्गासाठी ४ पदे अशी एकूण ११ पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या संख्येमध्ये किंवा आरक्षणामध्ये वाढ अथवा घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा आणि त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. जाहीरनामा प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास (अर्थात ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी) सर्व प्रवर्गातील उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे. महसूल सेवक (कोतवाल) हे पद अवर्गीकृत असल्यामुळे सामाजिक, आर्थिक व महिला आरक्षण वगळता इतर कोणत्याही प्रकारचे वयोमर्यादेतील शिथिलता लागू असणार नाही. अर्जदार उमेदवार हा मुरुड तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज तहसीलदार मुरुड यांच्या कार्यालयातून ५० रुपये रोख शुल्क भरून प्राप्त करून घ्यावा. अर्ज भरताना सोबत आवश्यक सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर २०२६ असून, कार्यालयीन वेळेत हे अर्ज प्रत्यक्ष तहसील कार्यालय मुरुड येथे सादर करायचे आहेत. टपाल किंवा ईमेलद्वारे पाठवलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तसेच खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३०० रुपये परीक्षा शुल्क रोख स्वरूपात जमा करावी लागेल.
UPSC 2027 चे कॅलेंडर जाहीर! IAS/IPS होण्यासाठी किती महिन्यांचे करेंट अफेयर्स वाचावे? जाणून घ्या
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी तहसील कार्यालय मुरुड किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय अलिबाग येथील नोटीस बोर्डाशी संपर्क साधावा.






