फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Pune Metro Recruitment 2026: पुणे आणि ठाणे येथे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या व्यावसायिक व वित्त (Finance) क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत वित्त विभागात विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमार्फत एकूण ५ रिक्त पदे भरली जाणार असून, यामध्ये उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक या उच्च पदस्थ पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत देण्यात आली आहे.
या भरती मोहिमेत वित्त क्षेत्रातील उप महाव्यवस्थापक-ई३ पदासाठी १ जागा, तर व्यवस्थापक -ई२ / सहाय्यक व्यवस्थापक-ई१ या पदांसाठी एकूण ४ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून CA किंवा ICWA ची पदवी असणे आवश्यक असून, SAP किंवा ERP चे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय पदानुसार उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ ते ४५ वर्षे अशी निर्धारित करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी १०० रुपये तर UR आणि OBC उमेदवारांसाठी ४०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १८ सप्टेंबर २०२६ ही अंतिम तारीख आहे.
इच्छुक व पात्र उमेदवार हा महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर – ४४० ०१०. या ठिकाणी अर्ज करू शकतो. या भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती, वयोमर्यादा, वेतन आणि अटी महा-मेट्रोच्या www.mahametro.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.






