फोटो सौजन्य- सोशल मीडिया
MPSC Exam Cancelled 2026: महाराष्ट्र लोक सेवा आयोगतर्फे अन्न व औषध प्रशासन विभागातील ‘ड्रग इन्स्पेक्टर, गट-ब’ पदांच्या भरतीबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या आणि गैरव्यवहाराच्या तक्रारीनंतर आयोगाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत २२ मार्च २०२६ रोजी राज्यभरातील ६ विभागीय केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने स्क्रीनिंग परीक्षा पार पडली होती. त्यानंतर १२ जून रोजी निकाल जाहीर करून ५०६ उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले होते आणि १ जुलै ते २२ जुलै दरम्यान मुलाखती पार पडल्या होत्या. परंतु, परीक्षा संपल्यानंतर आणि मुलाखतींच्या सुमारास काही उमेदवार व लोकप्रतिनिधींनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच, म्हणजेच २२ मार्चच्या आधीच प्रश्नपत्रिका काही जणांपर्यंत पोहोचल्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची तक्रार MPSC कडे केली.
उमेदवारांच्या वाढत्या तक्रारी आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन MPSC ने २७ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करून तपास करण्याचे आवाहन केले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीत, परीक्षा होण्यापूर्वीच किमान एका उमेदवाराच्या हाती प्रश्नपत्रिका लागल्याचे आणि त्याला त्याचा फायदा मिळाल्याचे उघडकीस आले. या प्राथमिक अहवालानंतर परीक्षेची विश्वासार्हता, पावित्र्य आणि पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आयोगाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
परीक्षा रद्द झाल्यामुळे उमेदवारांना पुन्हा एकदा परीक्षेची तयारी करावी लागणार असली, तरी आयोगाने स्पष्ट केले आहे की, यापूर्वी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा नवीन अर्ज करावा लागणार नाही तसेच त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. नवीन परीक्षेची तारीख आणि सविस्तर वेळापत्रक लवकरच MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






