फोटो सौजन्य- सोशल मीडिया
SNDT University Recruitment 2026: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठाने आपल्या चर्चगेट, जुहू आणि पुणे कॅम्पसमध्ये ‘सहाय्यक वसतिगृह अधीक्षक’ (Assistant Hostel Superintendent – Residential Post) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती पूर्णपणे ६ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर केली जाणार असून एकूण ४ पदांवर नियुक्ती केली जाईल. यामध्ये चर्चगेट कॅम्पससाठी १ पद, जुहू कॅम्पससाठी १ पद आणि पुणे कॅम्पससाठी २ पदे राखीव आहेत.
या पदासाठी अर्जदार उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (Postgraduate Degree) असणे आवश्यक आहे. समाजकार्य (Social Work), कम्युनिटी गायडन्स, समुपदेशन किंवा कौशल्य विकास क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच सरकारी किंवा निमसरकारी संस्थेत काम करण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे. याशिवाय मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, सर्वसाधारण गटासाठी वय १८ ते ४० वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ३०,००० रुपये ठराविक मानधन दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी साध्या कागदावर आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचा तपशील नमूद करून आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित (Self-attested) प्रतींसह अर्ज सादर करायचा आहे.
भरलेला अर्ज ‘कुलसचिव कार्यालय, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, ०१, नाथीबाई दामोदर ठाकरसी मार्ग, चर्चगेट कॅम्पस, मुंबई – ४०००२०’ या पत्त्यावर १५ ऑक्टोबर २०२६ (उद्या) रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या sndt.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.






