फोटो सौजन्य - Social Media
भारत, १५ एप्रिल २०२६ : बदलत्या रोजगार बाजारपेठेत नव्या पदवीधरांसाठी मोठ्या संधी निर्माण होत असल्याचे LinkedIn च्या ‘Grads’ Guide 2026’ अहवालातून स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार एआय स्पेशलिस्ट, जनरेटिव्ह एआय इंजिनिअर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ही पदे सध्या सर्वात वेगाने वाढणारी ठरत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रासोबतच इतर अनेक क्षेत्रांमध्येही तरुणांसाठी करिअरच्या नव्या वाटा खुल्या होत असल्याचे चित्र दिसत आहे.
मानवी संसाधन (HR), सल्लागार, माहिती तंत्रज्ञान, मार्केटिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि व्यवसाय विकास या क्षेत्रांमध्ये एंट्री-लेव्हल नोकऱ्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. युटिलिटीज, शिक्षण, सरकारी प्रशासन, वाहतूक व लॉजिस्टिक्स आणि ऊर्जा तंत्रज्ञान ही क्षेत्रे देखील करिअरची सुरुवात करणाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहेत. त्यामुळे पारंपरिक क्षेत्रांबरोबरच नव्या क्षेत्रांकडेही तरुणांचा कल वाढताना दिसतो.
विशेष म्हणजे, नोकरीच्या संधी आता केवळ मेट्रो शहरांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. Vijayawada, Bhopal, Jaipur, Indore, Gwalior आणि Vadodara यांसारखी निमशहरी शहरेही आता भरतीसाठी महत्त्वाची केंद्रे बनत आहेत. याशिवाय, १ ते १० कर्मचारी असलेल्या लहान कंपन्यांमध्येही भरतीत तब्बल ६४ टक्क्यांची वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
इंटर्नशिपचा अनुभव करिअर घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, कायदा, इंजिनिअरिंग, सल्लागार, उत्पादन व्यवस्थापन आणि व्यवसाय विकास या क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर न थांबता प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कौशल्यविकासावर भर देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
करिअर तज्ज्ञ निरजिता बॅनर्जी यांनी तरुणांना सल्ला देताना सांगितले की, पारंपरिक मार्गांपुरते मर्यादित न राहता नवीन आणि अनपेक्षित संधी शोधण्याची तयारी ठेवावी. विविध कौशल्ये आत्मसात करून स्वतःचे मजबूत पोर्टफोलिओ तयार करणे गरजेचे आहे. बदलत्या रोजगार बाजारपेठेत लवचिकता, सातत्य आणि सतत शिकण्याची वृत्तीच यशाचा खरा मार्ग ठरू शकते.






