वाढदिवसाचा केक कापताना वाद, तरुणावर घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार वार; लोणी काळभोर भागातील घटनेनं खळबळ

पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाढदिवसाचा केक कापताना झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले आहे. लोणी काळभोर भागात तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आला आहे.
Crime News, Maharashtra, Arrested News, Loni Kalbhor
वाढदिवसाचा केक कापताना वाद, तरुणावर घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार वार; लोणी काळभोर भागातील घटनेनं खळबळCrime News, Maharashtra, Arrested News, Loni Kalbhor
Published on: 
Updated on: 

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाढदिवसाचा केक कापताना झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले आहे. लोणी काळभोर भागात तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आला आहे. भांडण सोडवायला आलेल्या त्याच्या वृद्ध आजी-आजोबांनाही आरोपींनी खलबत्याने मारहाण केली आहे. या घटनेत तरुणासह आजी-आजोबा जखमी झाले असून, लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

जखमी तरुणाचे नाव आदित्य रामदास मेमाणे (वय १९, रा. फुले वस्ती, सिद्राम मळा, लोणी काळभोर) असे आहे. याप्रकरणी रोहन आजिनाथ लोंढे (वय २६) याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेमाणे याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यच्या मित्राचा वाढदिवस साजरा केला जात होता. केक कापताना आदित्यचा आरोपींशी शाब्दिक वाद झाला. तो वाद त्यावेळी मिटला असे वाटत होते, मात्र आरोपींच्या मनात राग कायम होता. त्यातूनच शनिवारी (२१ नोव्हेंबर) मध्यरात्री आरोपी आदित्यच्या घराजवळ आले. आरोपींनी घराबाहेरून आदित्यला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यावर त्यांनी आदित्यवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आवाज ऐकून आदित्यचे आजी-आजोबा बाहेर आले. त्यांनी भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते थेट घरात शिरले. घरातील स्वयंपाकघरात असलेला खलबत्ता उचलून आरोपींनी आजी-आजोबांना मारहाण केली. धक्काबुक्कीत वृद्ध आजी-आजोबा खाली पडले. त्यांनाही गंभीर मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका किरकोळ वादातून घरात घुसून वृद्धांवरही हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नाळे पुढील तपास करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.