

Suspicious Death: सुनेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिचे सासरे आणि नणंद यांनी दाखल केलेले अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. सुरुवातीला या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान वेगळ्याच आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. कागदपत्रं आणि प्रथमदर्शनी पुराव्यांवरून या प्रकरणात हत्येचा गंभीर संशय निर्माण होत असल्याचं महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायमूर्ती माधव जामदार यांनी नोंदवलं आहे.
तपासातील धक्कादायक बाबी समोरभावना देवेंद्रकुमार सुतार आणि खेताराम आशुराम सुतार या दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने नाकारले आहेत. विवाहिता रेखा सुतार यांच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्यात सुरुवातीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान मृत महिलेला मारहाण झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचे समोर आले. याशिवाय कपाटात ठेवलेल्या एका साडीनेही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रेखा यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा कथित प्रयत्न झाल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तक्रारदारांच्या वतीने ॲड. सत्यम हर्षद निंबाळकर यांनी या जामीन अर्जांना कडाडून विरोध केला.
रेखा सुतार यांच्या शरीरावर विविध ठिकाणी आढळलेल्या जखमा तसेच शवविच्छेदन अहवालातील गळा आवळणे किंवा फास लावण्याशी संबंधित नोंदी न्यायालयाने गांभीर्याने विचारात घेतल्या. याशिवाय, कथितरीत्या फासासाठी वापरण्यात आलेली साडी काढून कपाटात ठेवण्यात आल्याची बाबही न्यायालयासमोर आल्यानंतर या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे. त्यामुळे सुरुवातीला आत्महत्येचा वाटणारा हा प्रकार आता हत्येच्या दिशेने वळला असून, या प्रकरणात हत्येचा गंभीर संशय बळावला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कोणाचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत?
विवाहिता रेखा सुतार यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सासरे खेताराम आशुराम सुतार आणि नणंद भावना देवेंद्रकुमार सुतार यांचे अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत.
या प्रकरणात हत्येचा संशय का बळावला आहे?
मृत रेखा सुतार यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा, शवविच्छेदन अहवालातील गळा आवळणे किंवा फास लावण्याच्या नोंदी, हृदयविकाराचा बनाव करण्याचा प्रयत्न आणि कथितरीत्या फासासाठी वापरलेली साडी काढून कपाटात ठेवल्याचे समोर आल्याने हत्येचा गंभीर संशय बळावला आहे.
हा गुन्हा सुरुवातीला कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल झाला होता?
विवाहिता रेखा सुतार यांच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्यात सुरुवातीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.