सौजन्य फोटो - सोशल मिडीया
बस मध्ये एकटी असल्याचा घेतला फायदा
मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली दररोज इतर विद्यार्थ्यांसोबत खासगी स्कूल बसने शाळेत ये-जा करत होती. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चालकाने केजी आणि प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी सोडण्यास सुरुवात केली. एक-एक विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर अखेर चिमुकली बसमध्ये एकटी राहिली. याच वेळी चालकाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
घरी आल्यानंतर प्रकार उघड
घरी परतल्यानंतर चिमुकलीने पोटात दुखत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर तिने आजीला बसचालकाने आपल्याला त्रास दिल्याचे सांगितले. चिमुकलीच्या या सांगण्याने कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी तातडीने शाळा प्रशासनाशी संपर्क साधून पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी चिमुकलीची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
पोक्सोअंतर्गत गुन्हा
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) बालकावरील बलात्काराशी संबंधित कठोर कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी आरोपीला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, स्कूल बस व्यवस्थापनातील कर्मचारी आणि शाळा प्रशासनाशी संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.






