संग्रहित फोटो
मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील शिवशाही सोसायटीत १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरील पॅसेजमधून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना घडली. विशेष म्हणजे, चिमुकली खाली पडली त्यावेळी तिच्यासोबत शेजारी राहणारी १० वर्षांची मुलगीही उपस्थित होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, अपघात की घातपात, याचा तपास सुरू आहे.
जेवणानंतर पॅसेजमध्ये खेळायला गेली होती चिमुकली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री जेवण झाल्यानंतर १८ महिन्यांची चिमुकली घराबाहेर सहाव्या मजल्यावरील पॅसेजमध्ये खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी शेजारी राहणारी १० वर्षांची मुलगीही तिथे होती. काही वेळातच चिमुकली अचानक खाली कोसळली. ती डक्टमधून खाली पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, तिचा तोल जाऊन ती पडली की तिला जाणीवपूर्वक ढकलण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चिमुकली पडल्यानंतर १० वर्षीय मुलगी निघून गेली
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकली खाली पडल्यानंतर १० वर्षांची मुलगी तिथून निघून गेली. त्यानंतर काही वेळाने ती पुन्हा पॅसेजमध्ये सायकल चालवताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली. त्यामुळे पोलिसांकडून या फुटेजचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. घटनेच्या वेळी नेमके काय घडले, याबाबत मुलीची माहितीही तपासात महत्त्वाची ठरणार आहे.
मांजरीवरून दोन्ही कुटुंबांत आधी वाद झाल्याचा दावा
पीडित कुटुंब १ ऑक्टोबर रोजी या इमारतीत राहण्यासाठी आले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मांजरीवरून दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वी वाद झाले होते. मात्र, या वादाचे नेमके कारण काय होते आणि त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या दिशेनेही तपास केला जात आहे.
आईची न्यायासाठी आर्त हाक
चिमुकलीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत मुलीचे वडील वाहनचालक असून आई गृहिणी आहे. या कुटुंबाला अन्य चार मुले आहेत. “शेजारच्या मुलीसोबत असताना माझ्या चिमुकलीचा असा मृत्यू झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा,” अशी मागणी चिमुकलीच्या आईने केली आहे.
१० वर्षीय मुलीविरोधात गुन्हा दाखल होणार?
दरम्यान, या प्रकरणात १० वर्षीय मुलीविरोधात थेट गुन्हा दाखल होईल का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम २१ नुसार, सात वर्षांपेक्षा जास्त आणि १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाने केलेली कृती ही त्या मुलाला आपल्या कृतीचे स्वरूप व परिणाम समजण्याइतकी परिपक्वता आहे की नाही, यावर कायदेशीरदृष्ट्या अवलंबून असते. त्यामुळे मुलीचे वय, तिची समज, परिस्थितीचे आकलन आणि हेतू यांचा विचार करूनच पुढील कायदेशीर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
Ans: गोरेगाव पूर्वेतील शिवशाही सोसायटीत १८ महिन्यांची चिमुकली सहाव्या मजल्यावरील पॅसेजमधून खाली पडली. यात तिचा मृत्यू झाला.
Ans: याबाबत अद्याप स्पष्टता नाही. चिमुकलीचा तोल गेला की तिला ढकलण्यात आले, याचा पोलीस तपास करत आहेत.
Ans: पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, मांजरीवरून दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वी वाद झाले होते. या वादाचा घटनेशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे






