सौजन्य फोटो - सोशल मिडीया
लाल सूटकेसमधून मृतदेहाचे तुकडे
६ ऑगस्ट रोजी तमिळनाडू एक्स्प्रेस नेहमीप्रमाणे आपल्या मार्गावर धावत होती. ट्रेनच्या डब्यात प्रवाशांमध्ये एक लाल रंगाचा सूटकेस ठेवण्यात आला होता. सुरुवातीला या सूटकेसकडे कुणाचे लक्ष गेले नाही. मात्र, ट्रेन पुढे जात असताना त्यातून येणारी दुर्गंधी वाढत गेली. अखेर ट्रेन आग्रा कैंट रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर प्रवाशांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सूटकेस उघडला तर त्यामध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळले. मात्र मृतदेहाचे डोके गायब होते. त्यामुळे पोलिसांसमोर महिलेची ओळख पटवणे, कठीण झाले.
CCTV फुटेजने तपासाला दिशा
पोलिसांनी तातडीने तमिळनाडू एक्स्प्रेसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच विविध रेल्वे स्थानकांवरील कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. लाल सूटकेस ट्रेनमध्ये कोठून आला, तो कोणी आणला आणि कोणत्या स्थानकावर ठेवण्यात आला, हे शोधण्यात येत होते. त्याच दरम्यान चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पुरुष आणि एक महिला लाल रंगाचा सूटकेस घेऊन जाताना दिसून आले. आग्रा कैंट स्थानकावर सापडलेला सूटकेस हाच असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला.
गुडुवांचेरीतील घरात आणखी धक्कादायक पुरावे
तपासात या दोघांची ओळख माणिकुद्दीन लस्कर आणि भगवती माजी अशी पटली. दोघेही चेन्नईतील गुडुवांचेरी परिसरातील एका भाड्याच्या घरात राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी या घराची झडती घेतली असता तेथेही महिलेच्या शरीराचे कापलेले तुकडे आढळून आले. याशिवाय घरातून एक मोठे भांडेही पोलिसांच्या हाती लागले. या भांड्यातूनही मानवी शरीराचे काही तुकडे मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून त्यातील काही भाग सूटकेसमध्ये भरून ट्रेनमधून आग्र्याकडे पाठवण्यात आल्याचा संशय अधिक झाला.
मृत महिलेची ओळख पटली
पोलिसांच्या तपासात मृत महिलेची ओळख पटली, ती ३८ वर्षीय हयात निशा होती. त्यानंतर पोलिसांनी तिचे माणिकुद्दीन लस्कर आणि भगवती माजी यांच्याशी असलेले संबंध तपासण्यास सुरुवात केली. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, आरोपींचा मृतकाशी काय संबंध होता आणि या गुन्ह्यामागे आधिपासुनच कट होता का, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असतानाच माणिकुद्दीन आणि भगवती दोघेही चेन्नईतून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली.
Key accused arrested in the Guduvanchery murder case * A woman’s body was found chopped into pieces inside a suitcase on the Tamil Nadu Express.
* Manik Uddin Laskar and his wife, Bagapathi Maji, arrested as key accused.
* Both were arrested in Kashimpur, Jiribam District,… pic.twitter.com/V0ox9LKXSY — Tamil Nadu Police (@tnpoliceoffl) August 29, 2026
मणिपुरात छापा, मुख्य आरोपी अटकेत
तपासादरम्यान माणिकुद्दीन लस्कर मणिपुरात असल्याची माहिती तमिळनाडू पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मणिपुरातील जिरीबाम जिल्ह्यातील काशिमपूर येथे कारवाई केली. या छाप्यात माणिकुद्दीन लस्कर याला अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपीला ट्रांझिट वॉरंटवर तमिळनाडूत आणले जात आहे. त्याची चौकशी केल्यानंतर हत्येचा नेमका घटनाक्रम आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पत्नीचा शोध सुरू
या प्रकरणात माणिकुद्दीन लस्कर आणि त्याची पत्नी भगवती माजी यांना मुख्य आरोपी म्हणून तपासले जात आहे. माणिकुद्दीन अटकेत असला तरी भगवती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास सुरू आहे.
हत्येमागील कारण काय?
लाल सूटकेसमधून सुरू झालेल्या या प्रकरणात पोलिसांसमोर अनेक प्रश्न आहेत. हयात निशा यांची हत्या नेमकी का करण्यात आली? हत्येचे नियोजन आधीपासुन होते का? मृतदेहाचे इतक्या निर्घृण पद्धतीने तुकडे करण्यामागे नेमका उद्देश काय होता? मृतदेहाचे काही भाग घरात आणि काही भाग ट्रेनमधील सूटकेसमध्ये का ठेवण्यात आले? तसेच माणिकुद्दीन आणि भगवती यांच्याशिवाय आणखी कोणी या हत्येत सहभागी होते का, याचाही तपास सुरू आहे.






