सौजन्य फोटो - सोशल मिडीया
पतीने गुपचूप केले दुसरे लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी प्रसाद (३१) ही महिला पतीसोबत मे फेअर गार्डन परिसरात राहत होती. तिच्या पतीने जुलै २०२६ मध्ये कोमल सरोज (२२) हिच्याशी दुसरा विवाह केल्याचे सांगण्यात येते. या विवाहाची माहिती पहिल्या पत्नीला नव्हती, असा आरोप आहे. रविवारी पती अचानक कोमलला घेऊन घरी आला. त्यामुळे लक्ष्मी आणि कोमल यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर लक्ष्मीने घराचा दरवाजा आतून बंद केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तिने कोमलवर चाकू आणि त्रिशूळाने हल्ला केल्याचा आरोप आहे.
११२ वर कॉल करताच पोलिसांनी तोडले दार
हल्ल्यात जखमी झालेली कोमल जीव वाचवण्यासाठी बेडरूममध्ये गेली. घरातून बाहेर पडणे शक्य नसल्याने तिने जखमी अवस्थेत ११२ क्रमांकावर फोन केला. कॉल मिळताच बोळींज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला आणि कोमलची सुटका केली. पोलिसांनी जखमी कोमलला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीचा तपास सुरू
दरम्यान, बोळींज पोलिसांनी लक्ष्मी प्रसाद हिला अटक केली. तिला वसई न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तिच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागील कौटुंबिक वाद आणि दुसऱ्या विवाहाची पार्श्वभूमी याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. संबंधितांचे जबाब नोंदवून हल्ल्याची नेमकी परिस्थिती स्पष्ट करण्याचे काम सुरू आहे. जखमी महिलेने वेळीच ११२ हेल्पलाईनवर संपर्क केल्याने पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचता आले.






