संग्रहित फोटो
उल्हासनगर : उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना सेंट्रल पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी सुमारे १५ किलो गांजा जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत ७ ते ८ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईनंतर हा गांजा नेमका कोणाला पुरवठा केला जाणार होता आणि या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सेंट्रल पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूने उतरून दोन्ही तरुण शांतिनगर परिसरातून जात होते. त्यावेळी त्यांच्याकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने कारवाईची तयारी केली. डीसीपी सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक शीतल बामणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने शांतिनगर परिसरात सापळा रचला. या कारवाईत दोन्ही तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील झडतीमध्ये सुमारे १५ किलो गांजा आढळून आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सौरभ वीरेंद्र पांडे (२३), रा. देवाईपूर गाव, पोस्ट मथेला, तहसील सकलडीहा, जिल्हा चंदौली आणि आकाश अरविंद साहनी (२५), रा. औरंगाबाद डीहवा गाव, पोस्ट मऊ, तहसील मऊनाथ भंजन, जिल्हा मऊ, उत्तर प्रदेश अशी आहेत.
उत्तर प्रदेशातून आणलेला गांजा उल्हासनगरमध्ये नेमका कोणाला पुरवठा केला जाणार होता, आरोपी शहरात कोणाच्या संपर्कात होते आणि या तस्करीमागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक शीतल बामणे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे, पोलीस कर्मचारी सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी, किशोर काळे, प्रशांत धुळे आणि अनिल घुले यांच्या पथकाने सहभाग घेतला.
सचिन गोरे, पोलिस उपायुक्त :
उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजा आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हा गांजा कोणाला पुरवठा केला जाणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.






