(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bigg Boss 20 Promo: सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’ सुरू होताच घरात ड्रामा पाहायला मिळू लागला आहे. ६ सप्टेंबरला शोचा ग्रँड प्रीमियर पार पडला आणि टीव्ही कलाकार, रॅपर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि इतर क्षेत्रातील कलाकारांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. आता शोच्या पहिल्याच एपिसोडचा प्रोमो समोर आला असून, त्यात माही विजच्या वागण्यावरून घरातील सदस्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रोमोमध्ये माही विज सुरुवातीपासूनच इतर स्पर्धकांना कामं सांगताना दिसते. तिच्या या ‘बॉसी’ अंदाजामुळे अमन गांधी, ईशा रिखी आणि अरिशफा खान यांच्यासह काही सदस्य नाराज झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस २०’च्या घरात पहिल्याच दिवसापासून वादाची ठिणगी पडली आहे.
प्रोमोच्या सुरुवातीला माही विज अभिनेता अमन गांधी याच्याकडे तिचं सामान उचलण्यासाठी मदत मागताना दिसते. अमन तिची मदत करण्यास तयार असतो, मात्र तिने नम्रपणे सांगावं, अशी अपेक्षा तो व्यक्त करतो.
अमनच्या या उत्तरामुळे माही नाराज होते. ‘मी तुला प्लीज का म्हणू?’ अशा अंदाजात ती त्याला प्रत्युत्तर देते. त्यानंतर दोघांमध्ये काही वेळ शाब्दिक वाद होतो. माही तिथून निघून जाते, मात्र तिच्या या वागण्यामुळे अमनही नाराज झालेला दिसतो.
🚨 Tomorrow’s Promo – And on the very first day, Mahhi Vij’s behaviour starts irritating the contestants as she goes around ordering everyone! #BBTak #BiggBoss20 pic.twitter.com/Ee8o3VKYln — BBTak (@BiggBoss_Tak) September 6, 2026
यानंतर माही विजचा सामना सोशल मीडिया स्टार अरिशफा खानसोबत झालेला पाहायला मिळतो. माही अरिशफाला चहा बनवण्यास सांगते. मात्र अरिशफाला माहीचा आदेश देण्याचा अंदाज आवडत नाही.
प्रोमोमध्ये चहावरून दोघींमध्ये चर्चा होताना दिसते. माही पुन्हा चहाबाबत सूचना देते, त्यावर अरिशफा नाराजी व्यक्त करते. ‘मला ऑर्डर्स दिल्या जात आहेत,’ अशा आशयाची तक्रार ती इतर सदस्यांकडे करते.
Bigg Boss 20: बिग बॉसमध्ये पुण्याच्या मराठमोळ्या रॅपरची एन्ट्री; ‘Yeda Yung’ फेम Yung DSA कोण?
ईशा रिखीनेही व्यक्त केली नाराजी
माही विजच्या वागण्यावर ईशा रिखी देखील नाराज असल्याचं प्रोमोमध्ये दिसतं. माही घरात आल्यापासून इतरांना चहा बनवणे, कपडे लावणे यांसारखी कामं सांगत असल्याचं ईशा म्हणते. त्यामुळे घरातील सदस्यांना माहीचा हा ‘बॉसी’ अंदाज खटकत असल्याचं स्पष्ट होत आहे.
दरम्यान, माही विजने ‘बिग बॉस’मध्ये येण्यापूर्वीच घरातील कामं आणि स्वच्छतेबाबत स्वतःला काहीशा कठोर स्वभावाची असल्याचं मान्य केलं होतं. आता तिचा हा स्वभाव घरातील इतर स्पर्धकांसोबतच्या नात्यांवर कसा परिणाम करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शोच्या सुरुवातीलाच माही विज चर्चेत आली असून, पुढील दिवसांमध्ये तिचा हा अंदाज कायम राहणार की स्पर्धक तिच्याविरोधात एकत्र येणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.






