(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Krishnavataram Global Release: कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर भारतीय संस्कृती आणि अध्यात्माच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखालील वर्ल्ड फोरम फॉर आर्ट अँड कल्चर (WFAC), आर्ट ऑफ लिव्हिंग (AOL) आणि डॉ. साजन राज कुरुप यांच्या क्रिएटिव्हलँड स्टुडिओज यांनी ‘कृष्णावतारम’ ट्रायलॉजीसाठी हातमिळवणी केली आहे. या सहकार्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित ही सिनेमॅटिक कथा आता जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
‘कृष्णावतारम: पार्ट 1 – हृदयम’ हा या ट्रायलॉजीचा पहिला भाग आहे. या चित्रपटातून भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांच्या लीला आणि दिव्य प्रवासाचे सिनेमॅटिक सादरीकरण करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक गज्जर यांनी केले असून निर्मिती साजन राज कुरुप आणि क्रिएटिव्हलँड स्टुडिओजने केली आहे.
‘कृष्णावतारम’ केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित न ठेवता त्याभोवती एक व्यापक सांस्कृतिक विश्व उभारण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. यामध्ये सिनेमा, सीरिज, संगीत, लाइव्ह एक्सपिरियन्सेस, गेम्स, शिक्षण आणि इमर्सिव्ह सांस्कृतिक अनुभवांचा समावेश असणार आहे.
ट्रायलॉजीतील पहिला भाग ‘कृष्णावतारम: पार्ट 1 – हृदयम’ ७ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये या चित्रपटाचा जागतिक थिएट्रिकल रिलीज करण्यात आला.
या सहकार्याला गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभणार आहे. चित्रपटाच्या संकल्पनेने प्रभावित झाल्यानंतर त्यांनी क्रिएटिव्हलँडसाठी मार्गदर्शक शक्ती म्हणून पुढे येण्याची भूमिका स्वीकारली आहे. WFAC आणि क्रिएटिव्हलँड यांच्यात सामंजस्य करार अर्थात MOU करण्यात आला असून, ट्रायलॉजीचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी गुरुदेवांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपाबद्दल भाष्य करताना त्यांच्या दिव्य आकर्षणाचा आणि ‘लीला’ या संकल्पनेचा उल्लेख केला. त्यांच्या मते, जीवन आणि संपूर्ण विश्व ही एक लीला असल्याची जाणीव झाली की अंतर्मनात कृष्णाचा जन्म होतो.
या सहकार्यामुळे ‘कृष्णावतारम’ला भारतीय प्रेक्षकांसोबतच जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भारतीय प्रवासी आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना लक्षात घेऊन चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इंग्रजी भाषांमध्ये पोहोचवण्याची तयारी करण्यात आली आहे.
प्रोड्यूसर डॉ. साजन राज कुरुप यांनी या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला. भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि वारसा जगभर पोहोचवणे, तसेच ‘कृष्णावतारम’ला सिनेमा, कला आणि सांस्कृतिक वारशाचा जागतिक उत्सव बनवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ‘वन वर्ल्ड फॅमिली’ अर्थात ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारातून प्रेरणा घेत WFACची स्थापना करण्यात आली आहे. जगभरातील कलाकार, परफॉर्मर्स आणि कला रसिकांना एकत्र आणणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
‘कृष्णावतारम’च्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील अध्यात्म, कला आणि वारसा आधुनिक सिनेमॅटिक माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ ट्रायलॉजी न राहता एका व्यापक सांस्कृतिक चळवळीचे रूप घेणार का, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.






