(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)
Abhinay Berde Career Break: मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता अभिनय बेर्डे सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. अभिनयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याने आपल्या करिअरमधून काही काळ ब्रेक घेण्याचं जाहीर केलं आहे. अभिनयच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
अभिनयने करिअरमधून ब्रेक घेण्यामागचं कारणही या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. अभिनय क्षेत्रापासून कायमचा दूर जाण्याचा त्याचा निर्णय नसून, स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्यासाठी तो काही काळ ब्रेक घेत आहे. विशेष म्हणजे, स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याच्याकडे अद्याप कोणतीही ठोस कल्पना नसल्याचं त्याने सांगितलं आहे.
अभिनयने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना थेट मदतीचं आवाहन केलं आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, “मी करिअरमधून ब्रेक घेतोय. पुढच्या प्रवासासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. कारण जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की कमेंट करा.”
व्हिडीओमध्ये अभिनय म्हणतो, “मी माझ्या करिअरमधून थोडा ब्रेक घ्यायचं ठरवलंय.” मात्र हा ब्रेक अभिनय क्षेत्र सोडण्यासाठी नसून, एका नव्या प्रवासासाठी असल्याचं त्याने स्पष्ट केलं. स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्यासाठी आपण हा ब्रेक घेत असल्याचं अभिनयने सांगितलं.
View this post on Instagram
विशेष म्हणजे, स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही अभिनयकडे सध्या कोणतीही ठोस कल्पना नाही. त्यामुळे त्याने आपल्या फॉलोअर्सना थेट आवाहन करत “काही आऊट ऑफ द बॉक्स, क्रेझी आयडिया तुमच्याकडे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा,” असं म्हटलं आहे.
चाहत्यांनी दिलेली एखादी कल्पना त्याला आवडली, तर त्यांच्यासोबत काम करण्याची संधीही देणार असल्याचं अभिनयने सांगितलं आहे. “तुम्हाला मी कोलॅब रिक्वेस्टसुद्धा नक्की पाठवेन,” असं त्याने म्हटलं आहे.
अभिनयच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. अनेकांनी त्याला स्टार्टअपसाठी वेगवेगळ्या कल्पना सुचवल्या आहेत. याचदरम्यान अभिनयची बहिण स्वानंदी बेर्डे हिची कमेंटही चर्चेत आली आहे.
स्वानंदीने अभिनयच्या पोस्टवर “भावा, माझ्यामध्ये गुंतवणूक कर” अशी मजेशीर कमेंट केली आहे. तिच्या या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आता अभिनय बेर्डे करिअरमधून ब्रेक घेतल्यानंतर नेमका कोणता व्यवसाय सुरू करणार आणि चाहत्यांपैकी कोणाची आयडिया त्याला पसंत पडणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.






