(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sachin Pilgaonkar: मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर आपल्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत असतात. विविध विषयांवरील त्यांची वक्तव्ये सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अशातच नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सूत्रसंचालक ओमकार जाधव याने इंटरनेटच्या वतीने सचिन पिळगांवकर यांची माफी मागितली. यावर सचिन यांनीही आपली भूमिका मांडली असून, या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच ‘अमुत तमुक’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान सूत्रसंचालक ओमकार जाधव याने सचिन पिळगांवकर यांच्याशी सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत संवाद साधला. यावेळी त्याने इंटरनेटच्या वतीने त्यांची माफी मागितली.
ओमकार म्हणाला, “प्रामाणिकपणे मला इंटरनेटच्या वतीने तुमची माफी मागायची आहे. मला माहीत नाही की कधी कोण या पद्धतीने तुमची माफी मागेल की नाही; पण हे मी खूप मनापासून करत आहे. यामागे कोणताही अजेंडा नाही. बऱ्याचदा तुमच्याबाबतीत वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा, मीम्स आणि ट्रोलिंग होताना आम्ही पाहतो. तुमच्या कामाचे चाहते आणि प्रेक्षक म्हणून, हल्ली ज्या प्रमाणात ट्रोलिंग वाढलं आहे, त्यामुळे मला खरंच तुमची माफी मागायची आहे.”
‘इंटरनेट जितकं रिवॉर्ड करतं, तितकाच मानसिक त्रासही देऊ शकतं’
सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा कलाकारांवर होणारा परिणामही ओमकारने यावेळी अधोरेखित केला. तो म्हणाला की, प्रेक्षकांना एखाद्या कलाकाराबाबत होणाऱ्या ट्रोलिंगचा त्रास होत असेल, तर संबंधित कलाकारालाही त्याचा त्रास होऊ शकतो.
“इंटरनेट जितकं रिवॉर्ड करतं, तितकाच जास्त मानसिक त्रासही देऊ शकतं. सचिन सरांच्या अनुभवांबद्दलची त्यांची मतं आणि त्यांचे अनुभव आपण समजून घ्यायला हवेत. त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले नाहीत, तर ते आपल्यापर्यंत कधी पोहोचणारच नाहीत,” असं ओमकारने म्हटलं.
तसंच, ज्येष्ठ व्यक्तींचा आणि त्यांच्या कामाचा अनादर करणं योग्य नसल्याचंही त्याने सांगितलं. सचिन पिळगांवकर यांनी आपले अनुभव सांगणं बंद केलं, तर प्रेक्षकांना अनेक महत्त्वाच्या अनुभवांपासून वंचित राहावं लागेल, अशी भावना त्याने व्यक्त केली.
ओमकारच्या या वक्तव्यावर सचिन पिळगांवकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. माफी मागण्याची गरज नसल्याचं सांगत त्यांनी स्वतःच्या विनोदबुद्धीविषयी भाष्य केलं.
सचिन पिळगांवकर म्हणाले, “सॉरी म्हणण्याची गरज नाही. मीसुद्धा ते समजू शकतो. मला परमेश्वराच्या कृपेने खूप सेन्स ऑफ ह्युमर आहे. माझी विनोदबुद्धी शाबूत आहे. त्यामुळे मला स्वतःवर हसायलाही खूप आवडतं.”
पुढे त्यांनी स्वतःवर हसण्याची क्षमता आणि निरोगी विनोदबुद्धी यांच्यातील संबंधही स्पष्ट केला. “माझ्यावर जे संस्कार झाले आहेत, त्यांनी मला शिकवलं आहे की माणूस जेव्हा स्वतःवर हसायला शिकतो किंवा स्वतःवर हसू शकतो, तेव्हा त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप हेल्दी असतो. तो कुठेतरी मला सापडला आहे,” असं ते म्हणाले.
‘मीही माझ्या मित्रांना मीम्स फॉरवर्ड करतो’
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीम्सबाबत बोलताना सचिन पिळगांवकर यांनी त्यांची मजेशीर बाजूही सांगितली. काही मीम्स त्यांनाही आवडतात आणि ते आपल्या मित्रांना फॉरवर्डही करतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.
“तू मीम्स वगैरे म्हणतोयस ना, त्यातल्या काही गोष्टी ह्युमर असतात आणि त्यावर मीही हसतो. मीही माझ्या मित्रांना ते फॉरवर्ड करतो. पण काही गोष्टींमध्ये शिवीगाळ असते किंवा त्या थोड्या खालच्या पातळीच्या असतात. अशा गोष्टी मी एन्जॉय करत नाही, कारण मीही माणूस आहे,” असं सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं.
सचिन पिळगांवकर यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरील विनोद, मीम्स आणि ट्रोलिंग यांमधील सीमारेषेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विनोदाचा आनंद घेताना व्यक्तीचा सन्मान आणि मर्यादा जपणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेतून अधोरेखित होतं.






