(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Madhuri Dixit: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’ सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या सहजसुंदर शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. प्रश्नोत्तरांच्या खेळासोबतच स्पर्धक आणि सेलिब्रिटी पाहुण्यांसोबत रंगणाऱ्या तिच्या दिलखुलास गप्पाही प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. आता आगामी भागात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम सहभागी होणार असून, या भागात धमाल-मस्तीचा तडका पाहायला मिळणार आहे.
‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर यावेळी माधुरी दीक्षितने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच गप्पांदरम्यान नम्रता संभेरावच्या लोकप्रिय ‘लॉली’ या पात्राचा विषय निघाला. माधुरीने आपल्याला लॉलीची भूमिका खूप आवडत असल्याचे सांगितले. हे ऐकून नम्रताचा आनंद गगनात मावेनासा झाला.
माधुरीने लॉलीच्या पात्राचे कौतुक करताच नम्रताने आश्चर्याने तिला विचारले, “तुम्ही माझं हे कॅरेक्टर पाहिलं आहे?” यावर माधुरीने होकार देत नम्रताच्या डेंटिस्टच्या स्किटचीही आठवण सांगितली. त्यानंतर नम्रताने माधुरीला लॉलीचा एखादा डायलॉग बोलण्याची विनंती केली.
‘मेरी आँखों में झाँको!’ म्हणत माधुरीने जिंकली प्रेक्षकांची मनं
नम्रताच्या विनंतीला मान देत माधुरीने लॉलीचा प्रसिद्ध डायलॉग, “मेरी आँखों में झाँको!” अगदी खास अंदाजात म्हणून दाखवला. माधुरीच्या तोंडून लॉलीचा हा डायलॉग ऐकताच मंचावर एकच हास्यकल्लोळ झाला. माधुरीने लॉलीच्या शैलीत केलेल्या या नक्कलमुळे कार्यक्रमातील हा क्षण विशेष रंगतदार ठरला.
आपल्या आवडत्या अभिनेत्रीने साकारलेल्या या मजेशीर अंदाजामुळे नम्रताही भारावून गेली. ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागातील हा खास क्षण प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.
कशी तयार झाली नम्रता संभेरावची ‘लॉली’?
याच कार्यक्रमात नम्रता संभेरावने ‘लॉली’ हे लोकप्रिय पात्र कसे साकारले, यामागची गोष्टही सांगितली. नम्रता म्हणाली की, ती लालबागमधील एका चाळीत लहानाची मोठी झाली. लहानपणापासूनच तिने चाळीतील आणि आजूबाजूच्या महिलांचे वेगवेगळे हावभाव, बोलण्याच्या पद्धती आणि त्यांची देहबोली जवळून पाहिली होती. या निरीक्षणांचा उपयोग तिला लॉली हे पात्र साकारताना झाला.
लॉलीची हेअरस्टाईल स्वतः ठरवल्याचेही नम्रताने सांगितले. हे पात्र इतरांपेक्षा वेगळे दिसावे, अशी तिची इच्छा होती. लॉली थोडेफार इंग्रजी बोलते; मात्र आपण अतिशय उत्तम इंग्रजी बोलतो, असा तिचा ठाम आत्मविश्वास असतो. अशा अनेक छोट्या गोष्टी एकत्र करून, त्यांना थोडे अतिशयोक्त स्वरूप देत हे अनोखे पात्र तयार झाल्याचे नम्रताने स्पष्ट केले.
माधुरी दीक्षितचे सूत्रसंचालन, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांची धमाल आणि नम्रता संभेरावच्या ‘लॉली’ची खास झलक यामुळे ‘कोण होणार करोडपती’चा आगामी भाग मनोरंजक ठरणार आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर आणि सोनी लिव्हवर पाहता येईल.






