(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Aai Tuljabhavani Serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सध्या नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. मालिकेत बालशौर्याचा नवा प्रवास उलगडणारी ‘तुळजाची बालसेना’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवरात्रोत्सवाच्या विशेष भागात आई तुळजाभवानी आपल्या भक्तांना धैर्य, एकजूट आणि संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, यंदा AI आणि VFX तंत्रज्ञानाच्या मदतीने देवीचे दिव्य, तेजस्वी आणि भव्य रूप साकारण्यात आले आहे.
असुरिकेच्या मायावी शक्तीचे बालसेनेसमोर आव्हान
असुरिकेशी झालेल्या संघर्षात पद्मावर हल्ला झाल्यानंतर बालटोळी घाबरली आहे. ‘असुरांशी लढणं आपलं काम नाही,’ असं म्हणत ही बालसेना हतबल झालेली दिसते. दुसरीकडे, महादेवांच्या लीलेने गुहेत बंदिस्त असलेली असुरिका ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे पुन्हा प्रकट झाली आहे. त्यामुळे बालरूपातील तुळजाई आणि तिच्या बालसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
असुरिकेने रचलेल्या मायावी लीलेत भव्य मायावी महाल, कपटी मायाजाळ आणि दैवी शक्तींचा थरार पाहायला मिळणार आहे. या संकटाचा सामना करताना तुळजाई आणि तिची बालसेना कोणती युक्ती लढवणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. अत्याधुनिक VFX तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकारलेला हा कथाभाग प्रेक्षकांना पौराणिक विश्वाचा भव्य अनुभव देणार आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवात मालिकेत आई तुळजाभवानीचे तेजस्वी आणि अलौकिक रूप पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. पारंपरिक आभूषणांनी सजलेली देवी, तिच्या हातातील शंख, कमळ, गदा, त्रिशूळ, तलवार आणि सुदर्शन चक्र यांची भव्यता या विशेष सादरीकरणातून अधोरेखित करण्यात आली आहे.
प्रत्यक्ष चित्रीकरणाला AI तंत्रज्ञानाची जोड देऊन देवीचे रूप साकारण्यात आले आहे. दिव्य प्रकाशकिरणांनी उजळलेली आणि प्रसन्न मुद्रेने खुललेली देवीची प्रतिमा प्रेक्षकांना जणू प्रत्यक्ष गाभाऱ्यात उभे राहून दर्शन घेत असल्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न करते.
मालिकेचे VFX दिग्दर्शक प्रदीप भगत यांच्या मार्गदर्शनाखाली VFX आणि AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हे विशेष सादरीकरण तयार करण्यात आले आहे. देवीच्या रूपातील बारकावे आणि तिच्या आयुधांची भव्यता ३६० अंशांतून दाखवण्यासाठी टीमला एकूण तीन दिवस लागले.
AI तंत्रज्ञान प्रत्येक वेळी नवीन आणि वेगळी प्रतिमा तयार करत असल्याने देवीच्या रूपात एकसंधता राखणे आणि त्यातील मूळ दैवी भाव कायम ठेवणे हे टीमसमोर मोठे आव्हान होते. त्यासाठी प्रत्यक्ष चित्रीकरण, पारंपरिक 3D तंत्रज्ञान, VFX आणि AI यांचा एकत्रित वापर करण्यात आला.
कधी आणि कुठे पाहता येणार ‘आई तुळजाभवानी’?
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत भक्ती, बालशौर्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. देवीचे भव्य रूप आणि असुरिकेच्या मायावी शक्तींशी होणारा संघर्ष अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका ‘आई तुळजाभवानी’, रात्री ८.५० वाजता, फक्त कलर्स मराठीवर.






