(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Kon Honaar Crorepati: मराठी रिअॅलिटी शो ‘कोण होणार करोडपती’ सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित या शोचं सूत्रसंचालन करत असून, आतापर्यंत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली बेंद्रे, यामी गौतम आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी या शोमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी माधुरीने त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. आता या मंचावर आणखी दोन लोकप्रिय अभिनेत्रींची एन्ट्री होणार आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे ‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होणार असून, त्यांचा प्रोमो सध्या लक्ष वेधून घेत आहे.
सोनी मराठीने नुकताच ‘कोण होणार करोडपती’चा एक खास प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांची शोमध्ये एन्ट्री होताना दिसते. माधुरी दीक्षित दोघींचं स्वागत करते. त्यानंतर तिघींची भेट होते आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. विशेष म्हणजे, ‘हम आपके है कौन’ या गाजलेल्या चित्रपटातील माधुरीच्या अंदाजाची नक्कल करताना रेणुका आणि प्रिया दिसतात. त्यामुळे या भागात धमाल पाहायला मिळणार असल्याची झलक प्रोमोमधून मिळते.
‘रेणुका एकदा हसायला लागली की…’
प्रोमोमध्ये माधुरी दीक्षित रेणुका शहाणे यांच्या स्वभावाबद्दल एक मजेशीर किस्सा सांगताना दिसते. माधुरी म्हणते, “रेणुका एकदा हसायला लागली की मग काय बघायला नको. तिला थांबवणं खूप कठीण आहे.” माधुरीच्या या वक्तव्याला प्रिया बेर्डेही सहमती दर्शवताना दिसतात. तिघींमधील ही मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे या भागात जुन्या आठवणींसोबतच हास्याचे फवारेही उडणार आहेत.
माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांनी १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके है कौन’ या लोकप्रिय हिंदी चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता अनेक वर्षांनंतर या तिन्ही अभिनेत्री एकाच मंचावर एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
‘कोण होणार करोडपती’च्या या खास भागात तिघी कोणते मजेशीर किस्से सांगणार, चित्रपटाच्या सेटवरील कोणत्या आठवणी उलगडणार आणि त्यांच्या गप्पांमधून कोणते नवे खुलासे होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.






