(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Tarini Upcoming Twist: मराठी मालिकाविश्वात सध्या ‘तारिणी’ मालिकेची चांगलीच चर्चा रंगली आहे. मालिकेत एकामागोमाग एक रंजक ट्विस्ट पाहायला मिळत असून, आता कथेत आणखी एक थरारक वळण येणार आहे. तारिणी ‘ऑपरेशन तिरंगा’साठी काही दिवसांपूर्वी अमृतसरला गेली असून, या गुप्त मिशनदरम्यान ती एका दहशतवादी संघटनेत घुसली आहे. सध्या ती या संघटनेत ‘सलमा’ या नावाने वावरत आहे.
तारिणी स्पेशल क्राइम युनिटमध्ये काम करत आहे. ‘ऑपरेशन तिरंगा’ची माहिती मोजक्याच अधिकाऱ्यांना असल्याने तारिणी नेमकी कुठे गेली आहे, ती कधी परतणार आहे, याची तिच्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना नाही. विशेष म्हणजे, तिच्या युनिटलाही तारिणीच्या या गुप्त मिशनची माहिती नसल्याचं पाहायला मिळत आहे.
‘ऑपरेशन तिरंगा’अंतर्गत तारिणीने दहशतवादी संघटनेत प्रवेश केला आहे. या संघटनेकडून मोठ्या जीवितहानीचा कट रचला जात असल्याचं समोर आलं आहे. हा कट उधळून लावण्यासाठी तारिणी स्वतःचा जीव धोक्यात घालून ‘सलमा’ म्हणून संघटनेत वावरत आहे.
नुकताच झी मराठीने मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तारिणीच्या गुप्त मिशनमधील थरारक प्रसंग पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
प्रोमोमध्ये तारिणीचे वरिष्ठ अधिकारी तिला एक डिव्हाइस देतात. “हे डिव्हाइस शत्रूच्या सेफहाऊसमध्ये प्लँट कर, म्हणजे आपल्याला रेग्युलर अपडेट्स मिळत राहतील,” असं ते तिला सांगतात.
तारिणी हे डिव्हाइस दहशतवादी संघटनेच्या सेफहाऊसमध्ये लावते. मात्र, डिव्हाइस लावत असताना तिच्या हातून एक वस्तू खाली पडते. त्या आवाजाने तेथील एका महिलेचं लक्ष तिच्याकडे जातं. ती तारिणीला, “सलमा यहाँ क्या कर रही हो?” असा सवाल करते.
तारिणी प्रसंगावधान राखत, “नींद नहीं आ रही थी,” असं उत्तर देते. त्यामुळे तिच्यावरचा संशय तूर्तास दूर होतो.
दरम्यान, तारिणीच्या ऑफिसमध्येही हालचाली सुरू असतात. एक महिला अधिकारी वरिष्ठांना माहिती देते की, “सर, जीपीएस ट्रॅकर आणि ऑडिओ डिव्हाइस अॅक्टिव्ह झालेला दिसत आहे.” त्यामुळे तारिणीच्या मिशनमधील महत्त्वाची माहिती आता तिच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचणार आहे.
प्रोमोमध्ये पुढे दहशतवादी संघटनेचा प्रमुख तेथील महिलांना उद्देशून बोलताना दिसतो. तो त्यांना कौमसाठी अभिमान बाळगण्यास सांगतो. त्याचवेळी बसलेल्या महिलांपैकी एक कमी वयाची मुलगी त्याला थेट विचारते, “आप बस कहिए जनाब, कितनी जाने लेनी है?”
हे शब्द ऐकताच तारिणीच्या मनात संताप आणि निर्धार निर्माण होतो. ती मनोमन म्हणते, “मी यांचे इरादे सफल होऊ देणार नाही.”
आता तारिणी दहशतवाद्यांचा हा कट कसा उधळून लावणार? तिची खरी ओळख ‘सलमा’ म्हणून वावरणाऱ्या लोकांसमोर उघड होणार का? या जीवघेण्या मिशनमध्ये तारिणीला कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांत मिळणार आहेत.
नव्या प्रोमोमुळे ‘तारिणी’च्या कथानकातील थरार आणखी वाढला असून, ‘ऑपरेशन तिरंगा’चा हा नवा अध्याय प्रेक्षकांसाठी किती धक्कादायक ठरतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.






