( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Navratri 2026: नवरात्रोत्सव सुरू झाला की सर्वत्र गरब्याचा उत्साह पाहायला मिळतो. रंगीबेरंगी पोशाख, ढोल-ताशांचा गजर आणि गरब्याच्या तालावर थिरकणारे हजारो हात-पाय… या सगळ्यात ‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमाची क्रेझ काही औरच असते. दरवर्षी त्यांच्या गरबा नाइटची चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगते. यंदाही मुंबईतील त्यांच्या गरबा महोत्सवाने लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, यावेळी चर्चेचा विषय ठरले आहेत ते कार्यक्रमाचे तिकीट दर! कारण या महोत्सवातील सर्वात महागड्या VIP पॉडची किंमत तब्बल २.०४ लाख रुपये आहे.
फाल्गुनी पाठक यांचा ‘वेस्ट ॲव्हेन्यू रियल्टी नवरात्री उत्सव २०२६’ हा महोत्सव ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. नऊ रात्री चालणाऱ्या या उत्सवासाठी तिकिटांचे दर २ हजार रुपयांपासून ते २.०४ लाख रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा केवळ गरबाप्रेमींमध्येच नाही, तर सोशल मीडियावरही रंगताना दिसत आहे.
या महोत्सवातील सर्वात महागडा पर्याय म्हणजे ‘एक्सक्लुझिव्ह पॉड’. या खासगी VIP जागेची किंमत २ लाख ४ हजार रुपये आहे. या पॉडमध्ये एकावेळी १२ जण बसू शकतात. याशिवाय, निवडक दिवसांसाठी वैध असलेले १० हजार रुपयांचे खाद्यपदार्थ आणि पेयांचे व्हाउचरही या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे कुटुंबीय किंवा मित्रमंडळींसोबत खास पद्धतीने गरब्याचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे.
ग्रुपमध्ये गरबा खेळायचा? तिकिटांचे दर किती?
मित्रपरिवारासोबत गरब्याचा आनंद घेण्याची योजना आखणाऱ्यांसाठी आयोजकांनी ग्रुप पॅकेजेसही ठेवली आहेत. पाच जणांच्या ग्रुप तिकिटासाठी १३ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीमागे २ हजार ६०० रुपये खर्च येतो. तर १० जणांच्या ग्रुप पॅकेजची किंमत २५ हजार रुपये असून, त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचा खर्च २ हजार ५०० रुपये होतो.
आगामी वीकेंड आणि उत्सवाच्या शेवटच्या रात्रींसाठी काही तिकीट श्रेणी आधीच विकल्या गेल्याची माहिती आहे. मात्र, काही प्रीमियम पर्याय अद्याप उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.
साखरपुडा मोडल्यानंतरही आता पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र; इन्स्टावर दिली माहिती, म्हटले…
वातानुकूलित सभागृहात गरब्याचा जल्लोष
यंदाचा हा गरबा महोत्सव पूर्णपणे वातानुकूलित जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. येथे कार्पेट अंथरलेला डान्स फ्लोअर, आकर्षक रोषणाई आणि थेट कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, दररोज महाआरती, सशुल्क पार्किंग तसेच खाद्यपदार्थ आणि पेयांची सुविधाही उपलब्ध असेल.
‘गरबा क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाल्गुनी पाठक यांची नवरात्रोत्सवातील लोकप्रियता अनेक दशकांपासून कायम आहे. त्यांच्या गाण्यांवर गरबा खेळण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने चाहते एकत्र येतात. यंदाही मुंबईतील त्यांच्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, २.०४ लाख रुपयांच्या VIP पॉडच्या किमतीमुळे या गरबा महोत्सवाने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.






