(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
ठाण्यात प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात संजय दत्त उपस्थित होता. यावेळी अभिनेता हिंदीत बोलत असताना प्रताप सरनाईक यांनी त्याला मराठीत बोलण्याची विनंती केली. “आजकाल मी सगळ्यांना मराठी शिकवत आहे,” असं म्हणत त्यांनी संजय दत्तला मराठीत संवाद साधण्यास सांगितलं.
यानंतर संजय दत्तने माईक हातात घेत “हर हर महादेव”चा जयघोष केला आणि आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. “प्रताप भाई, मी सहा वर्षे येरवडा जेलमध्ये होतो. तेव्हाही मराठी शिकता आली नाही. थोडीफार शिकलो होतो,” असं तो म्हणाला. त्यानंतर त्याने मराठीत उपस्थितांना नमस्कारही केला.
संजय दत्तने सांगितलं २५ वर्षांचं नातं
या प्रसंगानंतर संजय दत्तने प्रताप सरनाईक यांच्याशी असलेल्या जुन्या मैत्रीचाही उल्लेख केला. “मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी प्रताप भाईंचा आभारी आहे. आमचं नातं खूप जुनं आहे, जवळपास २५ वर्षांचं आहे,” असं त्याने सांगितलं. त्यामुळे त्याचं मराठीबाबतचं वक्तव्य हे प्रामुख्याने मिश्कील अंदाजात केलेलं असल्याचं कार्यक्रमातील वातावरणावरून दिसून आलं.
संजय दत्तच्या या वक्तव्याची चर्चा अशा वेळी होत आहे, जेव्हा महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरतं मराठीचं ज्ञान असण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. परिवहन विभागाच्या या भूमिकेमुळे भाषेच्या सक्तीवरून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर संजय दत्तने मंत्र्यांसमोरच मराठी बोलण्यास नकार दिल्याने सोशल मीडियावर या घटनेची चर्चा रंगली आहे. काही युजर्सनी संजय दत्तच्या विनोदी उत्तराचं समर्थन केलं, तर काहींनी या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
व्हायरल व्हिडीओवर काही युजर्सनी संजय दत्तने मंत्र्यांच्या विनंतीला मिश्कीलपणे उत्तर दिल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीच्या नियमाचा संदर्भ देत या घटनेतील विरोधाभासावर प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान, या घटनेवर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी संजय दत्तच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे हा विषय आता केवळ मनोरंजनविश्वापुरता मर्यादित न राहता राजकीय चर्चेचाही भाग बनला आहे.
संजय दत्तचं हे वक्तव्य विनोदी स्वरूपाचं असलं, तरी महाराष्ट्रातील मराठी भाषा आणि रिक्षा-टॅक्सी चालकांच्या नियमाच्या पार्श्वभूमीवर त्याची चर्चा आणखी रंगण्याची शक्यता आहे.






