(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर का भडकली श्वेता तिवारी?
पारुल गुलाटीसोबतच्या लाइव्हमध्ये नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंना श्वेता तिवारीने थेट केला सवाल
Shweta Tiwari:लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘द ट्रेटर्स २’मधील स्पर्धक श्वेता तिवारीने सोशल मीडियावर महिलांविरोधात वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद भाषेविरोधात आवाज उठवला आहे. महिलांना वैयक्तिकरित्या ओळखत नसतानाही त्यांच्याबद्दल अश्लील आणि अपमानास्पद कमेंट्स करण्याचा अधिकार युझर्सना कोणी दिला, असा सवाल तिने उपस्थित केला आहे. यासोबतच श्वेताने स्वतःला अभिमानाने ‘मराठी माणूस’ म्हणवणाऱ्या ट्रोलर्सनाही सुनावलं आहे.
श्वेता तिवारी नुकतीच ‘द ट्रेटर्स २’मधील सह-स्पर्धक पारुल गुलाटीसोबत इंस्टाग्राम लाइव्हमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला काही युझर्सच्या कमेंट्स दिसल्या. महिलांविरोधात वापरली जाणारी अपमानास्पद भाषा पाहून श्वेता अस्वस्थ झाली.
यानंतर तिने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. सोशल मीडियावर महिलांना शिवीगाळ आणि अपमानास्पद भाषेचा सामना करावा लागणे ही आता चिंताजनक बाब असून, अशा प्रकारची भाषा सामान्य कशी झाली, असा प्रश्न तिने उपस्थित केला.
श्वेताने सांगितलं की, महिलांविरोधात अशा कमेंट्स करणारे प्रत्येकजण अशिक्षित किंवा कठीण परिस्थितीतून आलेला असतोच असं नाही. अनेकदा सुशिक्षित लोकही सोशल मीडियावर महिलांना अपमानित करताना दिसतात. विशेष म्हणजे, अशा लोकांच्या कुटुंबातही महिला असतात.
अभिनेत्रीने स्वतःला मिळणाऱ्या ट्रोलिंगचाही उल्लेख केला. काही युझर्स तिच्याबद्दलच नव्हे तर तिच्या मुलांबद्दलही त्रासदायक कमेंट्स करतात, असं तिने सांगितलं. अशा कमेंट्स करणाऱ्यांची प्रोफाइल पाहिल्यानंतर त्यांच्या पत्नी, मुली आणि कुटुंबातील इतर महिलांचे फोटो दिसतात, याकडेही तिने लक्ष वेधलं.
श्वेताने सवाल केला की, ज्यांचा तुमच्याशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही, अशा महिलांचा अपमान करणं तुम्हाला योग्य कसं वाटू शकतं?
श्वेताने यावेळी स्वतःचा महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीशी असलेला संबंधही अधोरेखित केला. ती आयुष्यभर महाराष्ट्रात राहिली असून, मराठी संस्कृतीशी आपलं घट्ट नातं असल्याचं तिने सांगितलं.
तिच्या मते, मराठी संस्कृती महिलांचा, त्यांच्या सामर्थ्याचा आणि प्रतिष्ठेचा आदर करायला शिकवते. त्यामुळे स्वतःला अभिमानाने ‘मराठी माणूस’ म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सोशल मीडियावर महिलांचा अपमान करणं योग्य आहे का, असा सवाल तिने केला.
श्वेताने या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही थेट प्रश्न विचारला. ती म्हणाली की, जर अशा प्रकारे महिलांशी गैरवर्तन करणारे लोक तुमचे समर्थक असतील, तर तुम्हाला त्यांचं हे वर्तन योग्य वाटतं का, हे जाणून घ्यायला मला आवडेल.
श्वेताने पुढे महिलांच्या सन्मानाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. एखादी महिला आपल्याला आवडते किंवा आपण तिला वैयक्तिकरित्या ओळखतो म्हणूनच तिचा आदर करायचा असं नसावं. फक्त आपल्या आवडत्या महिलांचाच नव्हे, तर सर्व महिलांचा आदर केला पाहिजे, असा संदेश तिने दिला.
सोशल मीडियावर महिलांना लक्ष्य करणाऱ्या ट्रोलिंगविरोधात श्वेताने घेतलेल्या या भूमिकेची आता चर्चा होत आहे.






