

जपानी एग सँडविचला ‘तामागो सँडो’ असे म्हणतात. मऊ ब्रेड, उकडलेली अंडी आणि मेयोनेझ हे त्यातील मुख्य घटक आहेत.
उकडलेली अंडी मॅश करून त्यात मेयोनेझ, मीठ, काळी मिरी आणि मोहरीची पेस्ट मिसळून सँडविचचे क्रीमी मिश्रण तयार करता येते.
कमी वेळात तयार होणारा हा सँडविच नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय आहे.
सकाळच्या नाश्त्यामध्ये नेहमी पोहे, उपमा किंवा इडली खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळे करून पाहायला हवे. यासाठी जपानी एग सँडविच हा उत्तम पर्याय ठरू शकतो. जपानमध्ये लोकप्रिय असलेल्या या सँडविचला 'तामागो सॅंडो' (Tamago Sando) असे म्हणतात.हे मुख्यतः सेव्हन इलेव्हन च्या दुकान बनवलेले भेटते पण हे तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता. मऊ ब्रेड, उकडलेली अंडी आणि क्रीमी मेयोनेझ यांच्या मिश्रणातून हा स्वादिष्ट पदार्थ तयार केला जातो. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त साहित्याची किंवा वेळेची गरज नाही. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा सँडविच आवडू शकतो.
जपानी एग सँडविच बनवण्यासाठी चार ब्रेड स्लाइस, तीन उकडलेली अंडी, दोन टेबलस्पून मेयोनेझ, एक टीस्पून बटर, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर आणि अर्धा टीस्पून मोहरीची पेस्ट घ्या. आवडीनुसार थोडे दूध किंवा क्रीमदेखील वापरू शकता
सर्वप्रथम तीन अंडी पाण्यात व्यवस्थित उकडून घ्या. अंडी उकडल्यानंतर ती थंड होऊ द्या आणि त्यांची साल काढून घ्या. आता एका बाऊलमध्ये उकडलेली अंडी घेऊन काट्याच्या मदतीने मॅश करा. त्यामध्ये मेयोनेझ, मीठ, काळी मिरी पावडर आणि मोहरीची पेस्ट घालून सर्व मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण चांगले क्रीमी होईपर्यंत मिक्स करा. मिश्रण अधिक मऊ हवे असल्यास त्यामध्ये थोडे दूध किंवा क्रीम घालू शकता.
यानंतर ब्रेडच्या स्लाइसला हलकेसे बटर लावा. एका स्लाइसवर तयार केलेले अंड्याचे मिश्रण समान प्रमाणात पसरवा. त्यावर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा आणि हलक्या हाताने दाबा. आता सँडविच मधून त्रिकोणी आकारात कापून घ्या. अशा प्रकारे तुमचा जपानी एग सँडविच तयार होईल.
या सँडविचचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची मऊ आणि क्रीमी रचना. जपानमध्ये हा सँडविच तयार करण्यासाठी 'शोकुपान' नावाचा मऊ आणि किंचित गोडसर मिल्क ब्रेड वापरला जातो. मात्र, घरी हा ब्रेड उपलब्ध नसल्यास साध्या पांढऱ्या ब्रेडचाही वापर करता येतो. सकाळचा नाश्ता, मुलांचा डबा किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी ही रेसिपी करून पाहू शकता. सँडविच तयार झाल्यानंतर लगेच खाणे उत्तम. अंड्याचे मिश्रण थंड ठेवा आणि उरलेले मिश्रण फ्रिजमध्ये सुरक्षितपणे साठवा. कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा जपानी पदार्थ तुम्हीही घरी नक्की करून पाहा.