अमरावती : दुचाकी बाजुला हटविण्यास सांगितल्याच्या कारणावरून फिरोज खान याची चाकूने भोसकून हत्या केल्या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी रविवारी रात्री लालखडी परिसरातून दुसऱ्याही आरोपीला अटक केली. तत्पूर्वी पोलिसांनी शारिक खान जाकिर खान याला अटक केली होती. सोमवारी आरोपी शारीक खान जाकीर खान (२२) व सोहेल खान फिरोज खान (२० दोन्ही रा. गुलिस्तानगर) यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोघांनाही १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना रविवार, ८ मे रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गुलिस्तानगर येथे घडली होती.
[read_also content=”दुचाकी हटविण्याच्या कारणावरून तरुणाची चाकूने भोसकून हत्या, दोन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/young-man-stabbed-to-death-for-removing-two-wheeler-nraa-277865.html”]
रविवारी दुपारी फिरोज खान यांचा साळा शेख जाकीर याचा शारीक खान व सोहेल खान यांच्यासोबत दुचाकी हटविण्याच्या कारणावरून वाद झाला होता. याबाबत माहिती मिळाल्यावर फिरोज खान व त्यांचे साळ भाऊ हे दोघे शारीक खान व सोहेल खान यांना समजावयास गेले. त्यावर शारीक खान व सोहेल खान यांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला होता. या हल्ल्यात फिरोज खान यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेनंतर काही तासाताच शारीक खानला अटक केली होती. त्यानंतर रात्री सोहेल खानला सुद्धा अटक करण्यात आली.






