Pune News: साहित्याच्या मांदियाळीत अध्यक्षाच्या खुर्चीचा हव्यास? 'मसाप'मध्ये प्रथमच पोलिस बंदोबस्त; विषय काय?

Pune News: सुनील महाजन गटाच्या म्हणण्यानुसार, बैठकीत तिन्ही पदाधिकारी अविश्वास ठरावाच्या कक्षेत असल्याने ते सभेचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नव्हते. त्यामुळे डॉ. पुरुषोत्तम काळे यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
मसापमध्ये अध्यक्षपदावरून वाद
महाराष्ट्र साहित्य परिषद फोटो- (गायत्री पवळे)
Published on: 
Updated on: 
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद

  • अविश्वास ठराव मंजूर झाल्याचा सुनील महाजन गटाचा दावा

  • अध्यक्ष योगेश सोमण यांनी सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याचे सांगितले

गायत्री पवळे/Pune News: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद शनिवारी (२८ नोव्हेंबर) अधिक तीव्र झाला. परिषदेच्या कार्यकारिणीच्या नियोजित बैठकीत अविश्वास ठरावावरून दोन गटांमध्ये मतभेद निर्माण झाले. विशेष म्हणजे, परिषदेच्या इतिहासात प्रथमच कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बैठकीनंतर दोन्ही गटांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत एकमेकांच्या दाव्यांना छेद देणारी भूमिका मांडली. सुनील महाजन यांच्या नेतृत्वाखालील २१ सदस्यांच्या गटाने अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्याचा दावा केला. तर, अविश्वास ठराव सभेपुढे मांडण्यापूर्वीच गोंधळ झाल्याने सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याचे सोमण यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विभागीय महिला सरचिटणीसपदी शर्मिला गायकवाड यांची निवड

२७ ऑक्टोबर रोजी २१ कार्यकारिणी सदस्यांनी तिन्ही पदाधिकाऱ्यांविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. आर्थिक व्यवहारांमध्ये कार्यकारिणीची मान्यता न घेणे, जिल्हा प्रतिनिधींना विश्वासात न घेणे, नांदी संमेलनाच्या खर्चातील अनियमितता आणि कामकाजातील त्रुटी असे आक्षेप या सदस्यांनी घेतले होती. शासनाकडून मिळालेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीचा हिशेब कार्यकारिणीसमोर मांडला नसल्याचाही त्यांचा आरोप होता.

सुनील महाजन गटाच्या म्हणण्यानुसार, बैठकीत तिन्ही पदाधिकारी अविश्वास ठरावाच्या कक्षेत असल्याने ते सभेचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नव्हते. त्यामुळे डॉ. पुरुषोत्तम काळे यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर तिन्ही पदाधिकाऱ्यांना खुलासा देण्याची संधी देण्यात आली; मात्र त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने २० सदस्यांनी एकमताने अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर अध्यक्षपदी सुनील महाजन, प्रमुख कार्यवाहपदी राजेंद्र लाखे आणि कोषाध्यक्षपदी उन्मेष गायधनी यांची निवड केल्याचा दावा करण्यात आला. तसेच नांदी संमेलनांचे आयोजन आणि खर्चाला स्थगिती देऊन यापुढील आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, अध्यक्ष योगेश सोमण यांनी हे सर्व दावे फेटाळले. बैठकीची सुरुवात महात्मा फुले यांना आदरांजली वाहून झाली. त्यानंतर इतिवृत्त वाचन आणि विषयपत्रिकेनुसार कामकाज सुरू असताना सुनील महाजन यांनी गोंधळ घातला. वारंवार विनंती करूनही कामकाज होऊ न शकल्याने अध्यक्षांच्या अधिकारात सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अविश्वास ठराव सभेच्या पटलावर आलाच नाही आणि त्यावर मतदानही झाले नसल्याचे सोमण यांनी सांगितले. तसेच महाजन गटाने केलेली पीठासीन अधिकाऱ्याची निवड चुकीची असल्याचा त्यांचा दावा आहे.

घटनेच्या वैधतेवरूनही दोन्ही गटांमध्ये मतभेद आहेत. महाजन गटाने धर्मादाय आयुक्तांकडे बदल अहवाल प्रलंबित असला तरी सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या घटनेनुसार कामकाज करता येते, अशी भूमिका मांडली. तर १९६३ नंतरच्या घटनादुरुस्त्या आणि बदल अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे मंजूर नसल्याने अविश्वास ठरावाची प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचे सोमण यांनी म्हटले. याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडून मार्गदर्शन घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरूनही चर्चा झाली. संमेलनाला आपला विरोध नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताध्यक्षपदाला आणि आयोजनाला पूर्ण सहकार्य करू, अशी भूमिका महाजन गटाने मांडली. तर संमेलनाचे नियोजन सुरळीत पार पाडणे हेच आपले प्राधान्य असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार नेमका कोणाच्या नेतृत्वाखाली चालणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Q

महाराष्ट्र साहित्य परिषदेत अध्यक्षपदावरून वाद का निर्माण झाला आहे?

A

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादामुळे कार्यकारिणीच्या बैठकीत अविश्वास ठरावावरून दोन गटांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

Q

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत पोलिस बंदोबस्त का तैनात करण्यात आला होता?

A

अध्यक्षपदाच्या वादातून निर्माण झालेला तणाव आणि दोन गटांमधील मतभेद लक्षात घेता कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिषदेच्या इतिहासात प्रथमच बैठकीत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

मसापमध्ये अध्यक्षपदावरून वाद
“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले