रायगडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
रायगड जिल्ह्याात गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस कासळत आहे. सततच्या सुरु असणाऱ्या पावसामुळे रायगडमधील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा जोर वाढल्याने येथील नद्यांच्या पाणीपातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रायगडमध्ये पुरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पाली खोपोली राज्य महामार्गावरील पाली आंबा नदी पुलाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. या पुलावर पाणी साचलं असून या पाण्यातून वाट काढणं कठीण झालं आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारे, प्रवासी, विद्यार्थी, कामगार खाळंबले आहेत. पुलावरील पुराच्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
हेदेखील वाचा- गोंदियात पावसाचा जोर कायम; पावसामुळे बांध तलाव ओव्हर फ्लो; नागरिकांच्या घरात घुसलं पाणी
पाली खोपोली राज्य महामार्गावरील पाली आंबा नदी पुलाला पुराच्या पाण्याचा वेढा बसल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा खोळंबा झाला आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहराला देखील पावसाने झोडपून काढलं आहे. या शहरात पुरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अंबा नदी काठचा कोळी वाडा आणि खान मोहल्ला परिसरातील नागरिकांच्या घरात पुरांच पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून घरातील सामानाचं देखील नुकसान होत आहे. सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागोठणे बसस्थानक पाण्यात पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं आहे. तर शहरातील बाजारपेठेत देखील पाणी शिरलं आहे.
हेदेखील वाचा- ठाण्यात पावसाचा जोर वाढला; जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन
मुसळधार पावसामुळे रायगडमधील नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. नागोठण येथील अंबा नदी ओव्हरफ्लो झाली आहे. नागोठणे शहरात अंबा नदीचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागोठणे शहर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ देखील पाण्याखाली गेली आहे. रायगड जिल्ह्यात आज अतिवृष्टीमुळे महाड, पोलदपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील मुंबई विद्यापीठाच्या आज 25 जुलै 2024 रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
रायगडमधील अंबा, सावित्री, कुंडलीका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. शहरात सावित्री नदीचं पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाड शहरातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. महाड नगरपरिषदेकडून शहराला धोक्याची घंटा देण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सावित्रीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






