

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. मतदान संपल्यानंतर सायंकाळी एक्झिट पोलचे अंदाज जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील आजपर्यंतची ही निवडणूक तशी ऐतिहासिकचं राहिली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत काट्याची टक्कर पहायला मिळत आहे. दरम्यान एक्झिट पोलच्या अंदाजात महाविकास आघाडीला बहुमत मिळताना दिसत आहे तर महायुती १२१ जागांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही पोलमधून महायुतीला १८६ जागा मिळतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १५२ ते १६० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागा मिळतील. सहा ते आठ जागा इतर लहान पक्ष आणि अपक्षांना मिळतील असा अंदाज वर्तवला गेला आहे.
ELECTORAL EDGE ZE च्या अंदाजानुसार, भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. भाजपने सर्वाधिक १४८ जागांवर उमेदवार उभे केले असून ७८ जागा मिळू शकतात. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या २७ जागा कमी होत असल्याचं दिसत आहे.
मेघ अपडेट्सच्या अंदाजानुसार भाजपा महायुतीला १५० ते १७० जागा निवडणूक निकालात मिळतील तर काँग्रेससह महाविकास आघाडीला केवळ ११० ते १३० जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तसंच अपक्ष आणि इतरांना ८ ते १० जागा मिळतील. असा अंदाज आहे.
PMARQ च्या एक्झिट पोलमध्येही महाराष्ट्रात भाजप आघाडी म्हणजेच महायुतीला आघाडी मिळताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, महायुतीला 137-157, महाविकास आघाडीला 126-146 आणि इतरांना 2-8 जागा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल असा अंदाज मॅट्रीज एक्झिट पोलने वर्तवला आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 150-170 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 110-130 जागा मिळतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रात 288 जागा आहेत. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
महाराष्ट्राच्या 288 विधानसभा जागांसाठी मतदान सुरू आहे, तर झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात 38 जागांवर मतदान सुरू आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 58.22% मतदान झालं. त्याचवेळी झारखंडमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे, इथे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.59% मतदान झालं. दोन्ही राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया संपली आहे. यामुळे कित्येक उमेदवारांची भवितव्य EVM मध्ये बंद झालं आहे. दोन्ही राज्यांतील निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी एक्झिट पोलमधून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महायुतीतून भाजपा 149 जागांवर, शिवसेना 81 जागांवर आणि अजित पवार यांच्या एनसीपीने 59 जागांवर निवडणूक लढवली आहे. तर, MVA मध्ये काँग्रेसने 101, शिवसेना (यूबीटी) ने 95 आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एनसीपीने 86 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पार्टी आणि AIMIM यांसारख्या छोट्या पक्षांनीही निवडणुकीत भाग घेतला आहे. बसपाने 237 आणि AIMIM ने 17 उमेदवार उभे केले आहेत.