फोटो सौजन्य AI
‘नवभारत’ च्या पाहणीत शहरात सुमारे ८० हून अधिक क्लब नोंदणीकृत असल्याचे समोर आले. हजारो खेळाडू विविध स्तरांवर प्रशिक्षण घेत आहेत. जिल्हास्तरावर नागपूरच्या संघाने मागील अनेक वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. आंतरजिल्हा स्पर्धांमध्येही नागपूर आघाडीच्या संघांमध्ये राहिले आहे. असे असतानाही राष्ट्रीय संघ, आयएसएल आणि मोठ्या व्यावसायिक क्लबपर्यंत पोहोचणाऱ्या खेळाडूंची संख्या अत्यंत मर्यादित आहे. या प्रवासातील सर्वात मोठी अडचण प्रतिभेची नसून, सामान्य खेळाडूला मैदानापासून राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचविणाऱ्या मार्गाची आहे.
Nagpur News : जीवाची भीती ,रस्त्यांवर काढली रात्र ;जलशुद्धीकरणात क्लोरीन वायू गळती
भारतीय फुटबॉलमध्ये पंजाबची मिनेर्वा अकादमी एक उदाहरण म्हणून समोर येते. या अकादमीने केवळ स्पर्धा जिंकण्यावर भर न देता खेळाडू घडविण्याची संपूर्ण प्रक्रिया विकसित केली, कमी वयात प्रतिभा ओळखणे, निवासी प्रशिक्षण, शिक्षणासोबत खेळ, फिटनेस, पोषण, व्हिडिओ विश्लेषण आणि सातत्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव-या संपूर्ण मॉडेलमुळे खेळाडूंना दीर्घ प्रवासासाठी तयार केले जाते.
नागपूर आणि अशा यशस्वी मॉडेलमधील सर्वात मोठा फरक याच ठिकाणी दिसून येतो. नागपुरात अनेक खासगी अकादमी आपापल्या पातळीवर चांगले काम करत आहेत. मात्र शहरस्तरावर १०-१२ वर्षांच्या वयापासून खेळाडूची ओळख करून पुढील ८-१० वर्षांचे नियोजन करून त्याला घडविणारी सामायिक व्यवस्था अद्याप दिसत नाही.
फुटबॉल तज्ज्ञांच्या मते, एखाद्या शहराचे यश तेथे किती स्पर्धा होतात यावर ठरत नाही, तर तेथून किती खेळाडू उच्च स्तरावर पोहोचतात यावर ठरते, नागपुरात स्पधांची कमतरता नाही. शालेय स्पर्धा, जिल्हास्तरीय स्पर्धा आणि क्लब सामने नियमित होतात. मात्र स्पर्धेनंतर खेळाडूची पुढची पायरी काय, हा प्रश्न कायम आहे.
खेळाडूच्या कामगिरीचा डेटा तयार केला जातो का? त्याच्या कमतरतांवर स्वतंत्रपणे काम केले जाते का? त्याला चांगल्या क्लब आणि राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचण्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था आहे का? याच ठिकाणी सर्वात मोठा फरक दिसून येतो.
८८ माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मते, नागपुरात क्षमतेची कमतरता नाही. येथून अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहेत, मात्र सातत्याने खेळाडू घडविणारी व्यवस्था विकसित होऊ शकलेली नाही. फुटबॉलसाठी शहरात अनुभवाची कमतरता नाही. मात्र या अनुभवाचा उपयोग खेळाडू विकासाचे नियोजन करण्यासाठी किती केला जात आहे, हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे माजी खेळाडूचे मत आहे.






