कांदा लागवडीचा हंगाम जोरात; मजुरीचे दर हजाराच्या पार; वाढत्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीला

शेतात कांद्याची रोपे लावण्याची लगबग सुरू आहे; मात्र ही रोपे मातीत रुजवताना शेतकऱ्यांच्या घामाला चांगलीच किंमत मोजावी लागत आहे. अनेक अडचणींचा सामना करत शेतकरी कांदा लागवडीसाठी धडपडत आहेत.
Farmers News
onion News
Published on: 
Updated on: 

आळेफाटा : शेतात कांद्याची रोपे लावण्याची लगबग सुरू आहे; मात्र ही रोपे मातीत रुजवताना शेतकऱ्यांच्या घामाला चांगलीच किंमत मोजावी लागत आहे. एकीकडे मजुरांचे वाढलेले दर, दुसरीकडे रोपांची जुळवाजुळव आणि पाणी-वीजपुरवठ्याचा लपंडाव, अशा अनेक अडचणींचा सामना करत परिसरातील शेतकरी कांदा लागवडीसाठी धडपडत आहेत. लागवडीचा हंगाम जोरात असला, तरी वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताची मात्र घडी विस्कटू लागली आहे.

जुन्नर तालुक्यातील आळेफाटा, पिंपळवडी, राजुरी, बेल्हे परिसरात सध्या कांदा लागवडीच्या कामांना वेग आला आहे. शेतात कुटुंबातील सदस्यांसह महिला व पुरुष मजुरांची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र,कांदा लागवडीसाठी आवश्यक असणारे मजूर मिळवण्यापासून ते रोपांची वेळेत व्यवस्था करण्यापर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.

सध्या महिला मजुरांना दिवसाला एक हजार ते बाराशे रुपये, तर पुरुष मजुरांनाही जवळपास तेवढीच मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे कांदा लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मजूर उपलब्ध झाले तरी त्यांना वेळेत शेतात आणणे, पाण्याची व्यवस्था करणे आणि लागवडीसाठी रोपे उपलब्ध ठेवणे, अशी कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

पाण्याचे नियोजन महत्त्वाचे

कांदा लागवडीच्या काळात पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र,अनियमित वीजपुरवठ्यामुळे पाणी देण्याचे वेळापत्रक कोलमडते. वीज कधी येईल, किती वेळ राहील, याचा अंदाज नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करताना अडचणी येत आहेत. त्यात रोपे वेळेत उपलब्ध झाली नाहीत, तर लागवडीचा कालावधी वाढण्याची भीती असते. त्यामुळे मजूर, पाणी, वीज आणि रोपे या सगळ्यांचा मेळ घालताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना सुरुवातीलाच मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागत आहे. मजुरी, रोपे, पाणी, वीज आणि इतर मशागतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र,पीक बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर कांद्याला नेमका किती भाव मिळेल, याची कोणतीही शाश्वती नाही. गेल्या काही हंगामांतील बाजारभावातील चढ-उतार पाहता शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. शहरातील ग्राहकांना बाजारात कांद्याचे भाव दिसतात; मात्र त्या कांद्यामागे शेतकऱ्याने केलेली मेहनत, मजुरीसाठी केलेली धावपळ आणि उत्पादनासाठी उचललेला आर्थिक भार फारसा दिसत नाही. आज रोपांच्या लागवडीसाठी शेतकरी घाम गाळत आहे; मात्र उद्या बाजारात त्याच्या कष्टांना योग्य मोबदला मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. कांदा लागवडीचा हंगाम जोमात सुरू असला, तरी वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावाची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक संकटाचे सावट कायम आहे.

Q

जुन्नर तालुक्यातील कोणत्या भागांत कांदा लागवडीला वेग आला आहे?

A

आळेफाटा, पिंपळवडी, राजुरी आणि बेल्हे परिसरात सध्या कांदा लागवडीची कामे जोरात सुरू आहेत.

Q

कांदा लागवडीसाठी मजुरांचे दर किती आहेत?

A

सध्या महिला मजुरांना दिवसाला एक हजार ते बाराशे रुपये, तर पुरुष मजुरांनाही जवळपास तेवढीच मजुरी द्यावी लागत आहे.

Q

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर कोणत्या प्रमुख अडचणी आहेत?

A

वाढलेली मजुरी, रोपांची अनुपलब्धता, अनियमित पाणी व वीजपुरवठा आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.