Tiger Shroff : 'डर तो लगता है, ऐसी मौत नहीं मरना'; टायगर श्रॉफवरील गोळीबाराने अभिनेत्रींना धडकी, सौजन्य : आयएएनएस
अभिनेता टायगर श्रॉफवर (Tiger Shroff) रविवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबईसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात प्रसिद्ध अभिनेत्याला लक्ष्य करण्यात आल्याने सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अभिनेत्री पूनम पांडे, नीतू चंद्रा, कुनिका सदानंद आणि उर्वशी रौतेला यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून, मुंबई पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
अभिनेत्री पूनम पांडे हिने या घटनेची बातमी ऐकल्यानंतर काही काळ आपल्याला विश्वासच बसला नसल्याचे सांगितले. ती म्हणाली की, गोळीबाराच्या घटनेतील संशयित तरुणांचे व्हिडिओ पाहून तिला धक्का बसला. चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या गुंडांपेक्षा हे तरुण वेगळे वाटत होते. टायगर श्रॉफसारख्या मोठ्या अभिनेत्याला लक्ष्य करण्यात आल्याने तिला आश्चर्य वाटले.
ती पुढे म्हणते, एखादी व्यक्ती फुटबॉल खेळून घरी परतत असताना त्याच्यावर हल्ला होणे ही अत्यंत भीतीदायक बाब आहे. आपण आज सुरक्षित आहोत, पण पुढच्या क्षणी काय घडेल, याची खात्री देता येत नाही. या घटनेत टायगर श्रॉफ सुरक्षित असल्याबद्दल तिने समाधान व्यक्त केले.
लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित प्रश्नावर प्रतिक्रिया देताना पूनम म्हणाली, भीती तर वाटतेच ना! आम्हाला अशा प्रकारे मरायचे नाही. ही घटना खूप भयानक आहे. कार्यक्रमांमध्ये सुरक्षारक्षक असले, तरी प्रत्येक ठिकाणी सुरक्षा घेऊन जाणे शक्य नसते. त्यामुळे कलाकारांनी आपल्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे तिने सांगितले.
अभिनेत्री नीतू चंद्रा हिलाही सुरुवातीला ही बातमी खोटी असल्याचे वाटले. मुंबईत अशा प्रकारची घटना घडू शकते, यावर तिचा विश्वास बसत नव्हता. मात्र, संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर तिला भीती वाटू लागली.
नीतू म्हणाली की, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. कलाकार मॉल, गर्दीची ठिकाणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना जात असतात. अशा वेळी बाहेर पडणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न आता निर्माण होत असल्याचे तिने नमूद केले.
महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास व्यक्त करत तिने या प्रकरणात योग्य कारवाई होईल आणि नागरिकांना पुन्हा सुरक्षित वाटेल, अशी आशा व्यक्त केली. अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याचे वडील जॅकी श्रॉफ यांच्या सुरक्षेबद्दलही तिने चिंता व्यक्त केली.
अभिनेत्री कुनिका सदानंद हिने या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकारांनी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर आवाज उठवण्याचे आवाहन केले. सरकारचे समर्थन करताना सरकारकडून नागरिकांच्या आणि कलाकारांच्या सुरक्षेसाठी काय केले जात आहे, याचाही विचार करायला हवा, असे ती म्हणाली.
कलाकार, त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. चित्रपट पाहण्यासाठी तिकीट काढून येणाऱ्या सामान्य प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठीही आवाज उठवणे आवश्यक असल्याचे तिने स्पष्ट केले. तसेच अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. टायगर श्रॉफ आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत आपल्या संवेदना असल्याचे सांगत तिने प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा तपास आणि पोलिसांची पुढील कारवाई याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: या घटनेमुळे आपल्याला धक्का बसल्याचे सांगत तिने कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या मृत्यूची भीती वाटत असल्याचेही तिने नमूद केले.
Ans: मुंबईसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अशी घटना घडल्याने तिने आश्चर्य आणि भीती व्यक्त केली. कलाकारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचेही ती म्हणाली.
Ans: कलाकारांनी कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर आवाज उठवावा, असे आवाहन तिने केले.






