चीन, मोदी अन् आरएसएसच्या उल्लेख; 'बिलॉन्गिंग' पुस्तकात नेमकं आहे काय?
Sonia Gandhi Memoir Belonging Controversy : काँकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आगामी पुस्तकाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनुसार, लेखिका सोनिया गांधी आणि पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (PRHI) यांच्यात पुस्तकातील काही परिच्छेदांवरून मतभेद झाले. प्रकाशकाने हस्तलिखितात काही बदल करून काही भाग काढून टाकण्याचा सल्ला दिला होता, परंतु सोनिया गांधींनी हे परिच्छेद काढून टाकण्यास नकार दिला. यानंतर, पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने भारतात हे पुस्तक प्रकाशित करण्याच्या करारातून माघार घेतली .
प्रकाशकाने हस्तलिखितातील काही मजकुरात बदल करण्यास तसेच काही भाग वगळण्यास सुचवले होते. मात्र, सोनिया गांधी यांनी संबंधित मजकूर हटवण्यास नकार दिल्याने PRHI ने भारतातील प्रकाशनाच्या प्रक्रियेतून स्वतःला बाजूला केल्याचे सांगितले जात आहे.
मोदी सरकार, आरएसएस आणि चीनच्या मुद्द्यांचा समावेश?
मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील मजकुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाशी संबंधित उल्लेख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतची (RSS) सामग्री तसेच चीनकडून भारतीय सीमेवर करण्यात आलेल्या कथित अतिक्रमणाशी संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे. या मजकुराबाबत पेंग्विन वर्ल्डवाइडला आक्षेप नसल्याचे सांगितले जाते. तरीही पेंग्विन इंडिया स्तरावर काही मजकूराबाब चिंता व्यक्त करत तो हटवण्याची मागणी कण्यात आली. मात्र, या तिन्ही विषयांशी संबंधित मजकूर हटवण्यास सोनिया गांधी यांनी नकार दिल्यामुळे पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने प्रकाशनातून माघार घेतली.
पेंग्विन रँडम हाऊस इंडियाचे स्पष्टीकरण
दरम्यान, या प्रकरणावर पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. ‘Belonging’ या पुस्तकाची भारतातील प्रकाशक म्हणून ती सध्या कार्यरत नाही. तसेच सोनिया गांधी यांनी संपादकीय बदल स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे कंपनीने पुस्तक प्रकाशित करण्यास नकार दिला, असे म्हणणे योग्य नसल्याचेही PRHI ने स्पष्ट केले.
प्रकाशकाच्या म्हणण्यानुसार, पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी त्यातील मजकुराची तथ्य पडताळणी करणे आणि पुस्तकाच्या हितासाठी लेखकाला आवश्यक सूचना देणे हा प्रकाशकाचा अधिकार तसेच जबाबदारी आहे. प्रकाशन प्रक्रियेत अशा प्रकारच्या सूचना देणे ही सामान्य बाब असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाबाबत झालेल्या चर्चेदरम्यान कंपनीची भूमिका सातत्याने पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा आणि तयारी अशीच होती. मात्र, सोनिया गांधींसोबत झालेल्या गोपनीय चर्चेबाबत यापेक्षा अधिक माहिती देण्यास कंपनीने नकार दिला.
वृत्तानुसार, पेंग्विन रँडम हाऊस इंडिया आणि सोनिया गांधी यांच्यात हस्तलिखिताच्या काही भागांसंदर्भात चर्चा झाली होती. प्रकाशकाने काही मजकूर बदलण्याचा आणि काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सोनिया गांधी हे बदल स्वीकारण्यास तयार नव्हत्या. परिणामी, पीआरएचआयने या प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. तथापि, परदेशात पुस्तकाच्या प्रकाशनाची प्रक्रिया सुरू आहे. ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक अमेरिकेत पेंग्विन रँडम हाऊसचा एक विभाग असलेल्या अल्फ्रेड ए. नॉफतर्फे प्रकाशित केले जाईल. सूत्रांनुसार, हे पुस्तक १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे.






