

मुंबईतील वरळी कोळीवाड्याची ग्रामदेवता म्हणून श्री गोलफादेवी माऊली प्रसिद्ध आहे.
भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवी म्हणून गोलफादेवीला 'बोलणारी देवी' असेही म्हटले जाते
कोळी, आगरी-कोळी आणि भंडारी समाजातील भाविक गोलफादेवीला कुलदैवत व ग्रामदैवत मानतात
मुंबईतील वरळी कोळीवाड्याची ग्रामदेवता आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारी ‘बोलणारी देवी’ म्हणून प्रसिद्ध असलेली श्री गोलफादेवी माऊली हे सुमारे ८०० वर्षांहून अधिक प्राचीन जागृत देवस्थान आहे. मुंबई शहराच्या ऐतिहासिक सात बेटांपैकी एक असलेल्या वरळी बेटावरील टेकडीवर वसलेले हे मंदिर कोळी बांधवांसह संपूर्ण मुंबईकरांच्या अपार श्रद्धेचे केंद्र आहे.
वरळी गावच्या या ग्रामदेवतेमागे अत्यंत रंजक इतिहास आणि दंतकथा प्रचलित आहेत. समुद्रात सापडलेल्या तीन पाषाण मूर्ती आहेत प्रचलित आख्यायिकेनुसार, शेकडो वर्षांपूर्वी वरळीतील मच्छीमारांना समुद्रात तीन पाषाण मूर्ती तरंगताना दिसल्या. जेव्हा ते या मूर्ती उचलायला गेले, तेव्हा त्यांना त्या मूर्तींचे वजन प्रचंड जड असल्याचे जाणवले. हा दैवी चमत्कार मानून कोळी बांधवांनी अत्यंत भक्तीभावाने त्या तिन्ही पाषाण मूर्तींची टेकडीवर प्रतिष्ठापना केली. या मंदिराच्या गाभाऱ्यात केवळ गोलफादेवीच नाही, तर तिच्या दोन्ही बाजूला तिच्या दोन बहिणी म्हणजेच श्री सकबा देवी (साकबादेवी) आणि श्री हरबा देवी यांच्याही प्राचीन पाषाणी मूर्ती विराजमान आहेत. या तिन्ही मूर्तींना शेंदूर लेपन केलेले असते.
ऐतिहासिक नोंदी आणि स्थानिक मान्यतांनुसार, १२ व्या शतकात माहीम येथे राजधानी वसवणाऱ्या राजा प्रताप बिंब (भीमदेव/बिंबशाह) याने या मंदिराचा जीर्णोद्धार करून स्थापना केली. राजा बिंबदेवाची कुलदेवता प्रभावती (प्रभादेवी) ही शाकंभरी देवीचे रूप असल्याने, गोलफादेवीलाही येथे ‘शाकंभरी देवी’चेच रूप मानून पुजले जाते.
अनेक शतके शेंदराच्या जाड थरांमुळे देवीचा मूळ चेहरा झाकला गेला होता. काही दशकांपूर्वी पुजाऱ्यांनी देवीचा कौल घेऊन जेव्हा शेंदराचा थर बाजूला केला, तेव्हा पाषाणावरील देवीचा तेजस्वी चेहरा प्रथमच भक्तांना स्पष्टपणे दिसू लागला.
कोळी आणि भंडारी समाजाची ग्रामदेवता आहे. श्री गोलफादेवी ही प्रामुख्याने मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या आगरी-कोळी (मच्छीमार) आणि भंडारी समाजाची कुलदेवता व ग्रामदेवता आहे. मासेमारीसाठी अथांग अरबी समुद्रात जाणाऱ्या कोळी बांधवांसाठी ती 'समुद्राची रक्षक' मानली जाते. वादळ-वाऱ्यांपासून संरक्षण मिळावे, प्रवास सुखरूप व्हावा आणि भरपूर मासळी मिळावी, यासाठी कोळी बांधव आजही होड्या पाण्यात लोटण्यापूर्वी देवीचे दर्शन घेतात.
ही मूळ कोळी समाजाची देवी असली तरी तिची ख्याती सर्वत्र पसरली आहे. वरळी व मुंबईसह गुजरात (अहमदाबाद, सुरत) आणि राजस्थान येथूनही हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येतात.
गोलफादेवी मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील ‘कौल विधी’. भक्त आपल्या मनातील शंका, संकटे किंवा नवीन कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी देवीचा थेट कौल घेतात. मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी भक्ताची समस्या देवीसमोर मांडतात. त्यानंतर देवीच्या मूर्तीच्या दोन्ही खांद्यांवर (उजव्या आणि डाव्या बाजूला) लागलेल्या ओलसर शेंदरावर एकाच वेळी दोन लहान चांदीच्या सुपाऱ्या किंवा चांदीचे गोळे चिकटवले जातात. मग होकार आणि नकार म्हणजेच जर उजव्या बाजूची सुपारी किंवा चांदीचा गोळा आधी खाली पडला, तर देवीचा कौल ‘होकार’ (काम यशस्वी होईल) असा मानला जातो. जर डाव्या बाजूची सुपारी आधी पडली, तर तो ‘नकार’ मानला जातो. कोळी बांधव आजही देवीने नकार दिल्यास समुद्रात मासेमारीला जात नाहीत. पण बुधवार सकाळी देवीचा कौल लावला जात नाही, ती देवीचा विश्रांतीचा वेळ मानला जातो.
संतती प्राप्ती, विवाह जुळणे, नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर होणे किंवा आजारपणातून बरे होण्यासाठी भाविक देवीला नवस बोलतात. इच्छा पूर्ण झाल्यावर भाविक देवीला साडी-चोळी, नारळ, पेढे, फुलांचे हार अर्पण करतात आणि गोंधळ घालून नवस फेडतात.
वार्षिक यात्रा (शाकंभरी पौर्णिमा) पौष महिना (जानेवारी) हा मंदिराचा सर्वात मोठा वार्षिक उत्सव आहे. यात्रेपूर्वी महिनाभर स्वच्छता चालते. १० दिवस मंदिर बंद ठेवून मूर्तींना नवीन शेंदूर लेपन केले जाते (या काळात प्रतिकात्मक मूर्तीची पूजा होते). यात्रेच्या आदल्या दिवशी सामुदायिक अभिषेक व हरिपाठ होतो, तर पौर्णिमेला भव्य जत्रा भरते.
शारदीय नवरात्रोत्सव आश्विन महिना (सप्टेंबर-ऑक्टोबर) नऊ दिवस मंदिरात प्रचंड उत्साह असतो. दररोज सकाळी व सायंकाळी महाआरती होते. रात्री देवीचा आकर्षक साजशृंगार केला जातो आणि भाविकांकडून जागरणासाठी पारंपरिक ‘गोंधळ’ घातला जातो. अष्टमीच्या रात्री होमहवन, पूर्णाहुती आणि महाभंडारा आयोजित केला जातो.
नारळी पौर्णिमा श्रावण महिना (ऑगस्ट)कोळी बांधवांचा हा सर्वात महत्त्वाचा सण. पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव वाजत-गाजत मिरवणूक काढून आधी गोलफादेवीची पूजा करतात आणि मग समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून मासेमारीच्या नवीन हंगामाची सुरुवात करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)