

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या Airtel ची सर्विस आज 26 डिसेंबर रोजी डाऊन झाली आहे. त्यामुळे युजर्सना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आज सकाळपासून Airtel युजर्स आउटेजचा सामना करत आहेत. हजारो वापरकर्त्यांनी या आउटेजची तक्रार केली आहे. तसेच अनेकांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर याचे मिम्स देखील शेअर केले आहेत. सकाळपासून सुरु असणाऱ्या या आऊटेजबद्दल अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
Airtel आऊटेजचा परिणाम हजारो युजर्सवर झाला आहे. खराब कनेक्टिव्हिटीमुळे देशातील विविध शहरांमध्ये Airtel ची सेवा अचानक ठप्प झाली आहे. या व्यत्ययामुळे मोबाईल इंटरनेट, सिग्नल रिसेप्शन आणि एकूणच कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला आहे. याचा परिणाम अनेक कामांवर देखील झाला आहे. DownDetector ने या आऊटेजबाबत माहिती शेअर केली आहे.(फोटो सौजन्य – pinterest)
ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म DownDetector नुसार, Airtel आऊटेजच्या आतापर्यंत 3,000 पेक्षा अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तक्रारींपैकी, 47% वापरकर्त्यांनी मोबाइल इंटरनेटसह समस्या नोंदवल्या. 30% लोकांना एकूण ब्लॅकआउटचा अनुभव आला आणि 23% लोकांना कोणताही मोबाईल सिग्नल प्राप्त करण्यात समस्या आल्या. या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जाव्यात, अशी मागणी आता युजर्सकडून केली जात आहे.
आज म्हणजेच 26 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण भारतातील एअरटेल सेवा बंद झाल्या आहेत. देशभरातील वापरकर्ते सेवा खंडित होत असल्याच्या तक्रारी सातत्याने करत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी मोबाईल आणि ब्रॉडबँड सेवेमध्ये येत असलेल्या समस्या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
DownDetector च्या माहितीनुसार, बहुतेक तक्रारी गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास नोंदवण्यात आल्या. नोंदवलेल्या वापरकर्त्यांपैकी 46 टक्के लोकांनी "संपूर्ण ब्लॅकआउट" ची तक्रार केली, 32 टक्के लोकांनी "सिग्नल नाही" आणि 22 टक्के लोकांनी मोबाईल कनेक्शनमध्ये समस्या असल्याची तक्रार केली. ही आकडेवारी गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंतची आहे. एअरटेलने या मुद्द्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा अधिकृत विधान जारी केलेले नाही, परंतु या प्रकरणामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. पण एका युजरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एअरटेलने ही समस्या दुपारी 2 वाजेपर्यंत सोडवण्याचे वचन दिलं आहे.
एका वापरकर्त्याने X वर लिहिले की एअरटेल ब्रॉडबँड आणि मोबाइल सेवा बंद आहे. मोबाईल आणि ब्रॉडबँडमध्ये नेटवर्क नाही. आणखी एका यूजरने प्रश्न विचारत लिहिले की, एअरटेल बंद आहे का? माझ्या वायफाय आणि मोबाईलवर इंटरनेट काम करत नाही. बेंगळुरू आणि अहमदाबादसह अनेक शहरांतील लोकांनी एअरटेलच्या सेवांमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार नोंदवली आहे. काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की त्यांना गेल्या 60 तासांपासून नेटवर्क समस्यांचा सामना करावा लागत आहे.