

जागतिक व्यासपीठावर वाद पेटला
भारताचे सडेतोड उत्तर
संविधानिक हक्क विरुद्ध सार्वजनिक सुव्यवस्था
देशाची राजधानी नवी दिल्लीत (CJP protest) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनादरम्यान आणि आंदोलनापूर्वी पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले आहेत. या कारवाईवर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने (OHCHR) चिंता व्यक्त केल्यानंतर भारत सरकारने यावर अत्यंत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भारताने यूएनची ही टिप्पणी पूर्णपणे बिनबुडाची आणि देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करणारी असल्याचे स्पष्ट करत ती थेट फेटाळून लावली आहे.
जंतरमंतर येथे प्रस्तावित असलेल्या या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत आधीच परवानगी नाकारली होती. तरीही आंदोलनाची तयारी दर्शवणाऱ्या 'सीजेपी'च्या प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि काही पत्रकारांना रविवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. या प्रतिबंधात्मक अटकेनंतर राजधानीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त
या संपूर्ण घडामोडींवर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटले होते की, दिल्लीतील मोठ्या आंदोलनांपूर्वी नागरी समाजाशी संबंधित लोक, कार्यकर्ते, वकील आणि पत्रकारांना ज्या प्रकारे ताब्यात घेण्यात आले आहे, त्याबद्दल आम्हाला खोल चिंता वाटत आहे. यूएनच्या या वक्तव्यानंतर लगेचच आंतरराष्ट्रीय कूटनीतीच्या पटलावर भारत आक्रमक झाला.
credit - social media and Twitter
जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी मिशनने तात्काळ अधिकृत निवेदन जारी करत या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. भारताने स्पष्ट केले की, देशात स्वतंत्र न्यायव्यवस्था, मोकळे माध्यम आणि भक्कम संविधानिक चौकट अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततेने एकत्र येण्याचा आणि आपले मत मांडण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. मात्र, लोकशाहीत सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षा राखण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ते निर्बंध घालणे हा सरकारचा कायदेशीर अधिकार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Starlink India: ‘प्रिय पंतप्रधान अंबानी…’; इलॉन मस्क यांनी Mukesh Ambaniना पुन्हा डिवचले; केंद्र सरकारनेही दिले चोख प्रत्युत्तर
भारताने केवळ यूएनच्या टिप्पण्या फेटाळल्या नाहीत, तर मानवाधिकार आयोगाला एक महत्त्वाचा सल्लाही दिला. भारताने युक्तिवाद केला की, संयुक्त राष्ट्रांच्या या संस्थेने कोणत्याही एका देशाबाबत भेदभाव न करता संपूर्ण जगातील इतर भागात होणाऱ्या मोठ्या आंदोलनांकडेही तितक्याच तटस्थतेने पाहिले पाहिजे. यूएन मानवाधिकार आयोगाने कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आणि राजकीय दबावाशिवाय आपल्या दिलेल्या अधिकारक्षेत्रात (Mandate) राहूनच कार्य केले पाहिजे, असे भारताने ठामपणे बजावले.
दिल्ली कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या नेत्यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, दुसरीकडे या घटनेने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी चर्चा घडवून आणली आहे. भारत आपल्या संप्रभुतेवर आणि अंतर्गत बाबींवरील कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाला अजिबात खपवून घेणार नाही, हाच संदेश या प्रत्युत्तरातून जागतिक समुदायाला देण्यात आला आहे.