US News: अमेरिकेत दरोडेखोरांचा थरार; सर्व रोकड दिल्यानंतरही ५६ वर्षीय गुजराती व्यापाऱ्याची मुलीसमोरच गोळ्या झाडून हत्या( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
अमेरिकेत (America) भारतीय वंशाच्या नागरिकांवर आणि विशेषतः लहान-मोठे व्यवसाय चालवणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अशीच एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना अमेरिकेतील टेनेसी राज्यातील जॅक्सन शहरातून समोर आली आहे. येथे एका दारूच्या दुकानात घुसलेल्या सशस्त्र दरोडेखोराने ५६ वर्षीय गुजराती व्यावसायिक सुरेश पटेल यांची अत्यंत निर्घृणपणे गोळ्या झाडून हत्या केली. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, दरोडेखोराने दुकानातील कर्मचाऱ्यांकडून सर्व रोख रक्कम हिसकावून घेतली होती, तरीही त्याने जात असताना अंदाधुंद गोळीबार केला आणि सुरेश पटेल यांचा जीव घेतला.
ही संपूर्ण थरारक घटना गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रिजक्रेस्ट रोडवरील ‘रिजक्रेस्ट सेलर्स’ या दारूच्या दुकानात घडली. मूळचे गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील काडी तालुक्यात असलेल्या अखज गावचे रहिवासी असलेले सुरेश पटेल गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास होते आणि त्यांनी काही दिवसांपूर्वीच या दुकानाचा ताबा घेतला होता. घटनेच्या वेळी सुरेश पटेल यांची १९ वर्षांची मुलगी दुकानात त्यांच्या अगदी जवळच उभी होती. दरोडेखोर अचानक दुकानात घुसला आणि त्याने बंदुकीचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. कर्मचाऱ्यांनी कोणतीही वेळ न गमावता कॅश काउंटरमधील सर्व रोख रक्कम त्याच्या स्वाधीन केली. मात्र, तरीही नराधमाने गोळीबार सुरू केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा
गोळीबाराच्या या भीषण घटनेत सुरेश पटेल यांच्या छातीत आणि शरीरावर गंभीर गोळ्या लागल्याने त्यांचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्यांची १९ वर्षांची मुलगी या गोळीबारातून सुखरूप बचावली, मात्र आपल्या वडिलांची डोळ्यांदेखत झालेली हत्या पाहून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. या गोळीबारादरम्यान दुकानातील एक ७० वर्षीय वृद्ध कर्मचारी प्रचंड घाबरून खाली पडला, ज्यामुळे त्याच्या मनगटाचे हाड मोडले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक जॅक्सन पोलीस विभागाने (JPD) दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला करणारा आरोपी पेंटबॉल स्टाइलचा मास्क घालून आला होता, जेणेकरून त्याची ओळख पटू नये. आरोपीने करड्या रंगाचा हुडी जॅकेट, जीन्स आणि काळे बूट घातलेले होते. दरोडा टाकून हत्या केल्यानंतर आरोपी दुकानाबाहेर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सेडान कारमधून फरार झाला. सध्या जॅक्सन पोलीस या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत असून मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War : रशियाविरुद्ध युक्रेनला मिळणार ‘कवचकुंडल’; फ्रान्स पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रतिबंधक प्रणाली
अमेरिकेत रात्री उशिरापर्यंत उघड्या असणाऱ्या सोयीस्कर स्टोअर्स (Convenience Stores) आणि दारूच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरात गुजराती समाजातील नागरिकांवर झालेले हे पहिलेच आक्रमण नाही. मे २०२५ मध्ये टेनेसीतील एका गॅस स्टेशनवर ३० वर्षीय परेश उर्फ प्रिन्स पटेल यांची दरोड्यादरम्यान हत्या करण्यात आली होती. त्यानंतर जून २०२५ मध्ये व्हर्जिनियातील नॉरफोक येथे दुकानात घुसून मेघना पटेल या गुजराती महिलेची गोळ्या झाडून हत्या झाली. तर सप्टेंबर २०२५ मध्ये किरण पटेल नावाच्या महिलेला पार्किंगमध्ये गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे अमेरिकेतील भारतीय आणि विशेषतः गुजराती समुदायामध्ये तीव्र भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.






