किया इंडियाने आपल्या आगामी फ्लॅगशिप थ्री-रो प्रीमियम SUV ‘किया सोरेंटो’ चे उत्पादन आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील प्लांटमध्ये अधिकृतपणे सुरू केले आहे. ही कार ४ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय बाजारात लाँच होणार असून, लाँचिंगपूर्वीच कंपनीने या कारचे पहिले अधिकृत फोटो जाहीर केले आहेत. तसेच, किआच्या अधिकृत डीलरशिप्स आणि वेबसाइटद्वारे या कारची प्री-बुकिंग देखील सुरू करण्यात आली आहे.
महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!
दमदार इंजिन पर्याय आणि ऑल-व्हील ड्राईव्ह सिस्टिम
ही नवीन प्रीमियम कार पेट्रोल/हायब्रिड आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, ऑल-व्हील ड्राईव्ह सिस्टिमसह येणारी कियाची ही भारतातील पहिलीच हायब्रिड SUV ठरणार आहे. या कारची निर्मिती भारतातच केली जात असल्याने, ही प्रीमियम SUV ग्राहकांसाठी अत्यंत स्पर्धात्मक आणि आकर्षक किंमतीत बाजारात उतरवली जाण्याची शक्यता आहे. डिझाइनच्या बाबतीत यात कियाचा प्रसिद्ध ‘टायगर नोज’ फ्रंट ग्रिल, वैशिष्ट्यपूर्ण लाईटिंग एलिमेंट्स आणि रुबाबदार प्रोफाईल देण्यात आले आहे.
जागतिक स्तरावर पहिल्यांदाच AI असिस्टंट तंत्रज्ञानाचा समावेश
या कारच्या केबिनला अधिक लक्झरी आणि प्रीमियम लुक देण्यात आला असून, यात ‘Live Generative AI’ वर आधारित ‘AI असिस्टंट’ फीचर मिळणार आहे. किआच्या सोरेंटो मॉडेलमध्ये जागतिक स्तरावर हे अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. ही प्रणाली नेहमीच्या व्हॉईस कमांडपेक्षा अधिक प्रगत असून ती चालकाच्या आणि प्रवाशांच्या दैनंदिन प्रश्नांना रिअल-टाईम माहितीसह उत्तरे देण्यास सक्षम आहे.
किया इंडियाचे वक्तव्य
उत्पादन सुरू झाल्याच्या प्रसंगी बोलताना किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ‘ग्वांग्गु ली’ म्हणाले की, सोरेंटो ही जागतिक स्तरावर किआच्या SUV नेतृत्वाचे प्रतीक राहिली आहे. अनंतपूर प्लांटमधून पहिली मेड-इन-इंडिया सोरेंटो बाहेर पडणे हा आमच्या प्रीमियम पोर्टफोलिओसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, आणि ही जागतिक दर्जाची कार भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.






