(फोटो सौजन्य-AI एआय)
टीव्हीएस मोटर कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत मोठी मजल मारत ओला इलेक्ट्रिकला मागे सोडले आहे आणि भारताची सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. वाहन पोर्टलवरील आकडेवारीनुसार, २४ ऑगस्टपर्यंत टीव्हीएसची एकूण विक्री ११,२७,८७३ युनिट्सवर पोहोचली आहे, तर ओला इलेक्ट्रिकची विक्री ११,१७,०३१ युनिट्स इतकी नोंदवली गेली आहे.
विक्रमी उडी आणि विक्रीचे आकडे
सुरवातीच्या काळात ओला इलेक्ट्रिकने बाजारात दबदबा निर्माण केला होता, परंतु एप्रिल २०२५ पासून टीव्हीएसने सातत्याने आपले स्थान मजबूत करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. जुलै २०२६ पर्यंत ओला इलेक्ट्रिक, टीव्हीएसपेक्षा सुमारे १६ हजार युनिट्सने पुढे होती. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या २४ दिवसांत टीव्हीएसने ३५,३०४ इलेक्ट्रिक स्कूटर्स विकल्या, तर या तुलनेत ओला केवळ ८,४६६ युनिट्स विकू शकली. या झटपट टर्नअराउंडमुळे टीव्हीएसने ओलाला मागे टाकत ऐतिहासिक आघाडी घेतली.
टीव्हीएसच्या यशाचे रहस्य: iQube आणि Orbiter ची लोकप्रियता
चालू वर्ष २०२६ मध्ये २४ ऑगस्टपर्यंत टीव्हीएसने ३,४२,९५८ इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली असून यामध्ये ७५ टक्क्यांची घसघशीत वार्षिक वाढ झाली आहे.
कंपनीच्या या अभूतपूर्व यशात लोकप्रिय TVS iQube आणि Orbiter ई-स्कूटरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. iQube ने नुकताच १० लाख विक्रीचा टप्पा पार केला आहे.
जून २०२६ मध्ये टीव्हीएसने एका महिन्यात ५५,७,८३ युनिट्स विकून आतापर्यंतचा सर्वोच्च मासिक विक्रम नोंदवला आहे. या वेगवान ट्रेंडनुसार टीव्हीएस २०२६ मध्ये ५ लाख विक्रीचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे.
ओला इलेक्ट्रिकसमोरील आव्हाने
दुसऱ्या बाजूला, ओला इलेक्ट्रिकसाठी मागील काही महिने कठीण ठरले आहेत. २०२४ मध्ये ४,२९,१८७ युनिट्स विकून ३५ टक्के बाजाराचा ताबा मिळवणारी ओला, २०२५ मध्ये घसरणीचा सामना करत २,०४,५४२ युनिट्सवर आली. २०२६ मध्ये २४ ऑगस्टपर्यंत कंपनी केवळ ८८,९१० युनिट्स विकू शकली असून तिचा बाजारहिस्सा घसरून ७ टक्क्यांवर आला आहे. सध्या टीव्हीएससह बजाज, एथर आणि हिरो यांसारखे ब्रँड्सही ओलाच्या पुढे निघून गेले आहेत.






